वर्धा : साताऱ्यात एका MBBS तरुणीला तिच्या प्रियकराने काही वादामुळे इमारतीवरुन ढकलून हत्या केली. ही घटना ताजी असतानाच आता वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील MBBSच्या द्वितीय वर्षाच्या एका विद्यार्थीनीने आत्महत्या केली आहे. मेडीकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पूजा रजना असं मृत मुलीचं नाव आहे.आत्महत्येच्या कारणांचा पोलीसांकडून अद्याप शोध सुरू. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह सावंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर घटनेची पोलीसांकडून चौकशी सुरू आहे. MBBSच्या दुसऱ्या वर्षाला ही तरुणी शिकत असल्याची माहिती मिळाली आहे.
कुटुंबियांचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप
वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थीनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर विद्यार्थीनीच्या आई वडिलांनी व्यवस्थानावर ताशेरे ओढत फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे कारण पुढे करून विद्यार्थीनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई आणि मामा यांनी केला आहे.