कोल्हापुरात जिल्ह्यातील विशाळगड व गाजापुरात कट रचून धार्मिक स्थळ व अल्पसंख्याकांवर हल्ला केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी संभाजीराजे यांना दोषी धरले होते. संभाजीराजे यांना छत्रपती शाहूराजेंचा उत्तुंग वारसा असताना त्यांनी असे पाऊल उचलायला नको होते. त्यांचे रक्त तपासून बघायला हवे. त्यांच्या आडून धर्मांध शक्तींनी डाव साधला. संभाजीराजेंच्या वागणे मलाच काय त्यांच्या वडिलांना देखील पटले नाही, अशी टीका आव्हाड यांनी केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला
संभाजीराजेंचे रक्त तपासून बघायला हवे, या आव्हाड यांच्या टीकेवर स्वराज्य संघटना आक्रमक झाली होती. त्यांनी लवकरात लवकर संभाजीराजेंची माफी मागावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेने केली होती. गुरुवारी दुपारीही पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांनी छत्रपती संभाजीराजेंना लक्ष्य केले.
याच पार्श्वभूमीवर चिडलेल्या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांची गाडी फोडण्याचा प्रयत्न केला. आव्हाड मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जात असताना फ्री वे जवळ त्यांच्या गाडीवर तिघांनी हल्ला केला. विशेष म्हणजे पोलिसांची गाडी आव्हाड यांच्या गाडीच्या मागेच होती. हल्ल्याचे गांभीर्य ओळखून आव्हाड यांच्या चालकाने शिताफीने वेगाने गाडी पुढे नेली.
जितेंद्र आव्हाड तुम्ही पळपुटे, स्वराज्य संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
जितेंद्र आव्हाड तुम्ही घाबरून का पळालात? एवढीच हिंमत आहे तर यायचे ना समोर, कॅमेरा समोर कोणीही छाती बडवतो, हिंमत असेल तर सामोरे या…. छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेली टीका स्वराज्यचा मावळा सहन करणार नाही. स्वराज्य पक्ष पूर्ण ताकदीने हल्ला करणाऱ्या आमच्या पक्षाच्या बांधवांच्या पाठिशी उभी आहे, असे स्वराज्यचे सरचिटणीस प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांनी सांगत हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
विशाळगडावर काय झाले होते?
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या शिवभक्तांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. दगडफेक, जाळपोळ, तोडफोड या पार्श्वभूमीवर भर पावसात गडावरील वातावरण तणावपूर्ण झाले होते. दोन आठवड्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील पाच ते सहा हजारावर शिवभक्त गडावर पोहोचले होते. त्याचवेळी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून स्थानिकांचे मोठे नुकसान झाले होते.