मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात लिफ्टमध्ये अडकून एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल शनिवारी दुपारी घडली. मुंबईतील धारावी परिसरात कोझी शेल्टर नावाच्या इमारतीमध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. मृत पावलेल्या मुलाचे नाव मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख असं आहे.कोझी शेल्टर इमारतीमध्ये राहणारा मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख हा मुलगा त्याची ७ वर्षांची मोठी बहीण आणि ३ वर्षांची लहान बहीण यांच्यासोबत तळमजल्यावरून बिल्डिंगच्या लिफ्टमधून घरी चालले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहोचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचा लोखंडी दरवाजा सरकवून आणि बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर गेल्या. त्यानंतर हुजेईफा हा बाहेर जात असतानाच लिफ्टचा सेफ्टी दरवाजा त्याच्या दिशेने आला. त्यानंतर त्याने दरवाजा ढकलण्याचा प्रयत्नही केला. परंतु दरवाजा त्याला पुढे ढकलता आला नाही. त्यामुळे हुजेईफा लिफ्टचा लोखंडी आणि लाकडी दरवाजाच्या मध्येच अकडला आणि लिफ्ट वरती जाताच तो मोकळ्या जागेत कोसळला आणि भिंतीला घासला गेला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Pune News: खेळताना अनर्थ, तीन वर्ष चिमुकलीच्या अंगावर गेट कोसळून मृत्यू; पुण्यातला थरारक Video
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैदी झाली असून त्यात संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही. परंतु लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही त्यामुळे ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे. लिफ्टमधून प्रवास करताना प्रत्येकाने काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आणि अंगावर शहारे येण्यासारखी आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची काळजी घेणं खूप गरजेचे आहे.
दरम्यान, पुण्यात अशीच एक भयंकर घटना घडली आहे. लहान मुले एकत्र खेळत असताना गेटमधून सायकल आत घेतल्यानंतर गेट लावून घेताना हे गेट एका तीन वर्ष चिमुकलीच्या अंगावर पडून तिचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील बोपखेल परिसरामध्ये काल बुधवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. गिरीजा शिंदे असं मृत्यूमुखी पडलेल्या चिमुलकीचं नाव आहे. गिरीजा तीन वर्षांची होती. बोपखेल भागामध्ये असणाऱ्या गणेश नगर परिसरात ते राहत होते.