नदीतून वाट वाढत महिलेला रुग्णालयात नेलं
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. एकीकडे सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यात रस्त्यांची दुरावस्था, नदीवर पूल नाही, तर कुठे आरोग्यवस्थेचा बोजवारा अशी परिस्थिती आजही दिसून येत आहे.
धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा येथे राहणाऱ्या गंमलीबाई किसन पावरा (वय ३८) या महिलेला ३० जुलै रोजी पोटात दुखत असल्याने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र धडगाव तालुक्यातील खुटवडा – कुडब्यापाडा ते बुन्नीपाडा या गावांना जोडणारा रस्ता नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी गर्भवती महिलेला झोळीच्या साहाय्याने बुन्नीपाडा येथून कुडब्यापाडा मार्गे खुटवडा या सात किलोमीटर मार्गावर पायपीट करावी लागली.
रस्त्यात येणाऱ्या उदय नदीतून वाट काढत प्रवास सुरू झाला. त्यानंतर तिला धडगाव रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी गंमलीबाई प्रसूती झाल्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने येथील पाड्यापर्यंत आणलं. परंतु पुढे बुन्नीपाडा येथे जायला रस्त्याचं नसल्याने पुन्हा पुराच्या पाण्यातून बांबूची झोळी करून जीवघेणा प्रवास करावा लागला. धडगाव तालुक्यापासून १७ किमी ऐवढे अंतर असून खुटवडा – कुडब्यापाडा एकूण ७.५ किमी अंतर आहे.
४ वर्षांपूर्वी रस्त्याला मंजुरी मिळाली, पण काम सुरू नाही; मूलभूत सुविधांपासून वंचित
गेल्या ४ वर्षांपूर्वी रस्त्यासाठी मंजुरी मिळून देखील रस्त्याच्या कामाची सुरुवात अद्यापही झाली नाही. अशात स्थानिक लोक मात्र अनेक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे शासनाने याकडे द्यावा अशी मागणी होत आहे. सातपुड्यातील दुर्गम भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अनेक गावापर्यंत जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे तेथे रुग्णवाहिका पोचू शकत नाही. पिण्याची पाण्याची समस्या, आरोग्य, शैक्षणिक समस्या अशा अनेक मूलभूत सुविधा मिळण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे.