मुंबईत आयोजित एका बैठकीत हे आदेश देण्यात आले असून या मतदारसंघातील जिल्हाध्यक्षांना निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे सांगण्यात आले आहे. या १६ जागांमध्ये कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम यांसारख्या मतदारसंघाचा समावेश असल्याचे कळते. विशेष म्हणजे, यातील काही ठिकाणी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मातोश्रीचं अंगण अर्थात वांद्रे पूर्व येथे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आमदार आहे, परंतु पारंपरिकरित्या युतीत ही जागा ठाकरे जिंकत आले होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वीच जागावाटप निश्चित करण्यासाठी समन्वय समिती जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वी पक्षाच्या राज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागा आणि इतर मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आल्यानंतर या निवडणुकीच्या तयारीसाठी जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याच अनुषंगाने मुंबई काँग्रेसने नुकतीच मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्षांची एक बैठक मुंबई कार्यालयात आयोजित केली होती.
या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्षांना मुंबई काँग्रेस चाचपणी करीत असलेल्या सर्व मतदारसंघाची यादी देण्यात आली आहे. या यादीतील मतदारसंघात जास्तीत जास्त कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याशिवाय विभागातील सर्व प्रश्नांची यादी लवकरात लवकर सादर करण्याचे आदेशही पक्षाकडून देण्यात आली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या १६ मतदारसंघांपैकी अनेक मतदारसंघात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या मतदारसंघांबाबत काय भूमिका घेतली जाते, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. या १६ मतदारसंघात कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, सायन, धारावी, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, चांदिवली, कांदिवली पूर्व, मालाड, घाटकोपर पश्चिम आणि मुलुंड या मतदारसंघाचा समावेश असल्याचे कळते.
राजकीय व्यवहार समितीत चर्चा नाही
या मतदारसंघांबाबत मुंबई काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीत चर्चा झालेली नसतानाही जिल्हाध्यक्षांना ही यादी दिल्याने काही पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केल्याचे कळते. दरम्यान, या सर्व मतदारसंघात लवकरच पक्षाकडून मुंबई यात्रादेखील काढण्यात येणार असून त्याचे आयोजन करण्याचे आदेश यानिमित्ताने देण्यात आल्याचे कळते.