भारतीय हवामान विभागाने ‘ऑरेंज अॅलर्ट’ दिल्यानंतर तयारीत राहणे अपेक्षित असते, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र या पार्श्वभूमीवर मुंबईत ऑरेंज अॅलर्ट, तसेच रेड अॅलर्ट देऊनही फारसा पाऊस न पडल्याचीही उदाहरणे दिली जात आहेत. ऑरेंज किंवा रेड अॅलर्ट दिल्यावर पाऊस न पडल्याने भारतीय हवामान विभागाने दिलेल्या या इशाऱ्यांच्या आधारावर सगळ्या यंत्रणा सातत्याने सज्ज कशा ठेवायच्या, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. महामुंबईमध्ये जुलैमध्ये दोन दिवस रेड अॅलर्ट जारी केल्यानंतर शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यांना दिलेली सुट्टी वाया गेल्याची भावना पालकांकडून व्यक्त करण्यात आली होती. केरळला दिलेल्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अॅलर्ट असताना दरडग्रस्त भागांमधील लोकांचे सातत्याने स्थलांतर करायचे का, अशीही विचारणा करण्यात येत आहे. भारतीय हवामान विभागाचे हे इशारे गोंधळात पाडणारे आहेत, अशी भावना या निमित्ताने व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान विभागाचे इशारे हे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०पर्यंत लागू होतात. त्यामुळे रात्री १२पर्यंतचा घड्याळी दिवस लक्षात घेऊ नये, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येते. या इशाऱ्यांव्यतिरिक्त ‘नाऊकास्ट’च्या माध्यमातून पुढच्या तीन तासांसाठीच्या परिस्थितीचा इशाराही देण्यात येतो. मात्र हे इशारे वेळेच्या काही काळ आधी मिळणे अपेक्षित असते. ती अपेक्षा पूर्ण होत नाही.
संवादपद्धती सुधारण्याची अपेक्षा
महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी इशारे ज्या वेळेपासून सुरू होतात, त्या नेमक्या वेळेला महापालिकेपर्यंत पोहोचतात, असे सांगितले. ही माहिती वेबसाइटवरही दिली जाते, असे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येते. मात्र सर्वसामान्य माणूस आणि प्रशासनही सातत्याने वेबसाइट पाहत नाही. त्यामुळे ही संवादपद्धती सुधारण्याची अपेक्षाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. ‘नाऊकास्ट’चे इशारे माध्यमांच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवले जातात, मात्र माध्यमांपर्यंत पोहोचणारे इशारे हे अर्धा ते पाऊण तास उशिरा पोहोचत असल्याचे दिसते.