ITR Scam : सायबर चोरट्याचं टार्गेट ITR; अशा मेसेजला बळी पडू नका, अन्यथा होईल खातं रिकामं, कशी घ्याल खबरदारी?

मुंबई : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची ३१ जुलैची मुदत संपताच आता वेगवेगळ्या माध्यमांतून परताव्याचे (रिफंड) संदेश येऊ लागले आहेत. या संदेशात लिंक पाठवून बँक खाते अद्ययावत करण्यास सांगितले जात आहे. मात्र हे सायबरचोरांनी टाकलेले जाळे असू शकते. एका क्लिकने तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

प्राप्तिकर विवरणपत्र मुदतीत भरण्यासाठी सरकारमार्फत अनेक संदेश येत होते. विवरणपत्र भरण्याची मुदत संपताच नागरिकांना आकर्षित करण्यासाठी रिफंड संदेश पाठविले जात आहेत. हे संदेश सरकारकडून नाही, तर सायबरचोरांकडून पाठविले जात आहेत, असे पोलिसांनी म्हटले आहे.

अशा आशयाचे संदेश

तुम्हाला आयकर परतावा म्हणून १५,४९० रुपये मिळणार आहेत. ही रक्कम तुमच्या खात्यावर थोड्याच वेळात जमा होतील. तुम्ही तुमचा खाते क्रमांक XXXXXXची खात्री करून घ्या. हा क्रमांक अयोग्य असेल, तर तुम्ही तुमच्या बँक खात्याची माहिती खालील लिंकवर अद्ययावत करू शकता.

अशी करतात फसवणूक

– लिंकवर क्लिक करून त्यात सांगितल्यानुसार केल्यास मोबाइलचा ताबा अन्य व्यक्तीकडे जातो
– बँक खात्याचा तपशील भरल्यास त्याबाबतही गोपनीयता राहत नाही
– ओटीपी म्हणून आलेले क्रमांक शेअर अथवा लिंकमध्ये टाकल्यास रक्कम परस्पर वळवली जाते
– डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती भरल्यास त्यावरूनही आर्थिक डल्ला मारला जातो
KYC Fraud: ‘केवायसी’ने केले कर्जबाजारी; माटुंग्यातील इस्टेट एजंटसोबत मोठा स्कॅम, काय घडलं?
हे लक्षात असू द्या

– विवरणपत्र भरल्यानंतर लगेचच परताव्याचा संदेश येणे अशक्य
– प्राप्तिकर विभागाकडून यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात येतो
– प्राप्तिकर विभागाकडे असलेल्या विवरणपत्रात बँक खात्यांचा तपशील असतो
– परताव्याचा संदेश येताच त्यातील लिंकवर क्लिक करू नये
– जवळील प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात शहानिशा करावी
– सीए किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यावा
– बँक खाते, कार्डचा तपशील अनोळखी व्यक्तीला देऊ नये

फसवणूक झाल्यास…

– पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा
– Cybercrime.gov.in यावर तक्रार नोंदविता येते
– सायबर पोलिस ठाण्यातही तक्रार करता येते
– स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो

Source link

itr fake emailsITR fake messagesitr filing 2024itr filing deadlineITR Scamमुंबई बातम्यासायबर चोरटेसायबर फसवणूक
Comments (0)
Add Comment