जलसाठे अद्याप कोरडेच! सिल्लोडमध्ये सरासरीइतक्या पावसानंतरची अवस्था, १७ गावांत टॅंकर

नीलेश सोनटक्के , सिल्लोड : पावसाळा लागून दोन महिने झाले, तरी अद्याप तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्यात सरासरी एवढ्या पावसाची नोंद झाली असली, तरी जलसाठे मात्र अद्याप कोरडेच आहे. परिणामी, भर पावसाळ्यात तालुक्यातील १७ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे तालुक्यात जोरदार पावसाची गरज आहे.

काही ठिकाणी दमदार

तालुक्यातील अंभई, केळगाव, उंडणगाव, आसडी, रहिमाबाद, गोळेगाव, हट्टी, मोहळ, बाळापूर, पानवडोद, धोत्रा, शिवणा, पालोद, मंगरुळ, वडाळा या परिसरात समाधानकारक पाऊस झालेला आहे. दमदार पाऊस झाल्याने खेळणा, जुई नदी दुथडी भरुन वाहिल्या. भराडी, अंधारी, निल्लोड, पळशी, भवन, आमठाणा, घाटनांद्रा, कायगाव, बोरगाव बाजार या परिसरात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी, नदी-नाल्यांसह जलसाठे कोरडेच असून, रिमझिम पावसावरच पिके बहरलेली आहे.

पिकांपुरताच पाऊस

पेरणीपासूनच पिकांपुरता पडत असल्याने तालुक्यातील बहुतांश जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढलेली नाही. शहरासह बारा- पंधरा गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या खेळणा मध्यम प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा आहे. अजिंठा-अंधारीत २५, केळगाव ५७ टक्के आणि चारनेर-पेडगावमध्ये जेमतेम पाणीसाठा आहे. निल्लोड प्रकल्प कोरडाच असून, उंडणगाव, रहिमाबाद लघु तलाव जोत्याखाली आहे.

भर पावसाळ्यात पाणीटंचाई

तालुक्यातील पूर्णा, अंजना या नदीकाठावरील गावांमध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यातही तालुक्यातील कोटनांद्रा, भवन, निल्लोड, म्हसला खु., बनकिंन्होळा, लोणवाडी, सिसारखेडा, धानोरा, पळशी, वडोदचाथा, वांगी बु., कासोद-धामणी, बाभुळगाव, मांडगाव, केऱ्हाळा, दीडगाव, गेवराई सेमी या गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासह पिकांची मदार आता श्रावणसरींवर अवलंबून असून ये रे ये रे पावसा म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

तालुक्यात झालेला पाऊस

तालुक्याची वार्षिक सरासरी ६५० मिलिमीटर आहे. तालुक्यात जुलैअखेरपर्यंत ३३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक ४७० मिलिमीटर पावसाची नोंद अंभई मंडळात झाली. सिल्लोड मंडळात ३०२, भराडी ३७१, अजिंठा ३१८, गोळेगाव बु. ३५८, आमठाणा ३०८, निल्लोड २३७ आणि बोरगाव बाजार मंडळात ३२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Source link

chhatrapati sambhajinagar newsjully rain conditionsillod newssillod water crisisपावसाळ्यात पाणीटंचाईबोरगावसिल्लोड पाऊस
Comments (0)
Add Comment