श्रेयवादाच्या लढाईत विकासकामे रखडली!
भाजप आमदार गणेश नाईक यांनी झोपडपट्टीच्या सर्व्हेक्षणाला विरोध केल्यामुळे ऐरोलीमध्ये शिंदे गटाचे विजय चौगुले यांनी नाईकांच्या विरोधात उपोषण सुरू केले असतानाच आज मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन नाईक यांच्या कार्यपध्दतीवर जोरदार टीका केली आहे. सीबीडी बेलापूर येथील खाडीमध्ये मरिना प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. प्रकल्पाची वर्कऑर्डर निघून सहा वर्षे उलटून गेले तरी अद्याप काम सुरू झालेले नाही, काम गणेश नाईक यांच्याच एका ठेकेदाराने घेतले आहे, त्यामुळे त्याच्याकडून काम करण्यास विलंब केला जात आहे असे मंदा म्हात्रे म्हणाल्या. इतक्यावर न थांबता गणेश नाईक यांच्यामुळे रखडलेल्या कामांचा मंदा म्हात्रेंनी भर पत्रकार परिषदेच पाढाच वाचला.
बेलापूरमधून सायन-पनवेल मार्गावर जाण्यासाठी कोकण भवन समोरील रस्त्यावरून जावे लागते. हाच रस्ता महामार्गाला जोडलेला असल्याने याच रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी सीबीडी सेक्टर ११ मधून एक उड्डाणपूल तयार करण्याचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता.याच उड्डाणपूलामुळे पामबिचवरून येणार्या वाहनांनाही कोकण भवन समोरील रस्ता टाळून महामार्गावर जाता येणार होते. पण नाईक यांनी हा प्रकल्प फक्त श्रेय मिळत नसल्यामुळे लटकवला. या प्रकल्पाची फाईल गायब करण्यासाठी अधिकार्यांवर दबाव आणला. शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये यासाठी नाईकांनी जिवाचा मोठा आटापिटा केला, असेही आरोप यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
पाच काम दाखवा एक लाख मिळवा..
पाच शासकीय कामे दाखवा एक लाख मिळवा बेलापूरची आमदार आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारी मलाच मिळणार आहे. तसे पक्षश्रेष्टींनी जाहीरही केले आहे. तरीही भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक या मतदारसंघात घुसखोरी करीत आहे. गणेश नाईक आणि संदीप नाईक इतकी वर्षे सत्तेत होते. तरी त्यांना नवी मुंबईचा अपेक्षीत विकास करता आला नाही. नाईक कुटूंबांची कोणतीही पाच शासकीय कामे दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असे आव्हानही मंदा म्हात्रे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना दिले आहे.
प्रचाराचा नारळ फुकट जाणार..
संदीप नाईक यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडला असला तरी तो फुकट जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत यांनी फक्त नारळच फोडला नव्हता तर प्रचारही सुरू केला होता. मात्र प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. यावेळी बेलापूरमधून उमेदवारीची नाईकांनी कितीही आटापिटा केला तरी उमेदवारी मलाच मिळणार आहे, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.