राजकारणात सक्रिय असताना निवडणूक लढावी असे प्रत्येकाला वाटते. हर्षवर्धन पाटील यांनी इच्छा व्यक्त केलेली जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. हर्षवर्धन पाटील, अजित पवार आणि आम्ही सर्व एकत्र चर्चा करून योग्य निर्णय करू. पक्षाचा कोणताही कार्यकर्ता हा महायुतीच्या विरोधात लढणार नाही. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे उमेदवार लढतील, तेथे बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली आहे.
राहुल गांधी यांना कशाची भिती आहे. ते अफवा का पसरवत आहेत. नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचे त्यांचे केविलवाने प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे आणि सुसंस्कृत राज्य आहे. सर्व नेत्यांनी राज्याच्या विकासाकरिता काम केले. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी कोणत्याही पक्षाच्या नेत्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.
एक दशकापूर्वी २०० कोटी रुपये असणारी वार्षिक योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बाराशे कोटी रुपयांची झाली. याखेरीज सरकारने पाच हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला. यातून शहर आणि ग्रामीण भागात पायाभूत सोयी आणि इतर विकास कामांना चालना मिळाली आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्या कार्यकारिणी बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत भाजप शहर कार्यकारिणी पार पडेल, शनिवारी सुरेश भट सभागृहात होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे. शहरातील बुथ पातळीपर्यंतचे पदाधिकारी उपस्थित राहतील,अशी माहिती शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली आहे.