कारंजा येथील सिंधी कॅम्पस्थित गोविंद भवनमध्ये गोलेच्छा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझ्यासह राजू पाटील राजे असे दोघेही पक्षाकडे उमेदवारी मागणार आहोत. दोघांपैकी कुणा एकाला उमेदवारी दिल्यास निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू. हे शक्य न झाल्यास उमेदवाराला घरचा रस्ता नक्की दाखवू, असेही गोलेच्छा म्हणाले.
प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू पाटील राजे हेही पत्रपरिषदेला उपस्थित होते. त्यांनीही गोलेच्छा यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. गोलेच्छा यांनी कारंजाचे नगराध्यक्ष असताना केलेली विकासकामे आजही जनतेसमोर आहेत. त्यांना किंवा आपल्याला उमेदवारी दिल्यास कारंजा-मानोरा मतदारसंघाचा विकास करू, असेही राजू पाटील राजे यांनी स्पष्ट केले.
चंद्रशेखर बावनकुळे नागपूरात काय म्हणाले!
विधानसभा निवडणुकीत सिटिंग-गेटिंग सूत्राचा अंमल करताना पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल, अशी ठाम भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात व्यक्त केली. जागा वाटपाचा मुद्दा पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आणि महायुतीचे नेते समन्वयाने सोडवतील, अशी खात्री त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजकारणात सक्रिय असताना निवडणूक लढावी असे प्रत्येकाला वाटते, पुण्यातून हर्षवर्धन पाटील यांनी इच्छा व्यक्त केलेली जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. मग आता हर्षवर्धन पाटील, अजित पवार आणि आम्ही सर्व एकत्र चर्चा करून योग्य निर्णय करू पुण्यातील जागेबाबत असे बावनकुळे म्हणाले. पक्षाचा कोणताही कार्यकर्ता महायुतीच्या विरोधात लढणार नाही. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचे उमेदवार लढतील, तेथे बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली आहे. अशातच आता वाशिममधील नरेंद्र गोलेच्छा आणि राजू पाटील राजे यांच्या इशारानंतर कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघाचा पेच महायुतीसमोर वाढणार असे चित्र दिसतंय.