अजित पवार काय म्हणाले?
काही राजकीय नेत्यांनी आरोप केले, की अजित पवारांनी मधल्या काळात जो निर्णय घेतला, त्यासाठी ते वेश बदलून दिल्लीला जायचे, हे धादांत खोटं आहे. माझ्या बदनामीचं आणि गैरसमज निर्माण करायचं काम सुरु आहे. काही जणांनी ते संसदेत झिरो अवरमध्ये काढलं.. अरे आधी माहिती तर घ्या, म्हणे अजित पवार नाव बदलून गेले, मी राज्याचं ३५ वर्ष प्रतिनिधित्व करतोय. काही काळ मी खासदार राहिलोय, कधी आमदार राहिलोय, कधी राज्यमंत्री, कधी विरोधीपक्ष नेता, काही काळ उपमुख्यमंत्री राहिलोय, जबाबदारी मला पण कळते, एखाद्याने नाव बदलून जाणं हा गुन्हा आहे. आता तर सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मला कोणी बहुरुपी म्हणतंय. म्हणणाऱ्यांना लाज लज्जा शरम वाटली पाहिजे. हे धादांत बिनबुडाचे आरोप असून त्यात तसूभरही तथ्य नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी वेश बदलून आणि खोट्या नावाने दिल्लीत गेल्याचे आरोप उडवून लावले.
कुठे पुरावा मिळाला, की मी नाव बदललं? मी तेव्हा विरोधीपक्ष नेता होतो, समाज मला ओळखतो, कोण म्हणते मी मिशा लावल्या, टोपी घातली, मास्क लावला, हे साफ चुकीचं आहे. हे सिद्ध झालं तर मी राजकारणातून निवृत्त होईन, जर नाही सिद्ध झालं, तर ज्या लोकांनी ही नौटंकी लावली आहे ना, पार पार्लमेंटपासून इथपर्यंत, त्यांना थोडी जनाची नाही तर मनाची वाटायला हवी.. असंही अजित दादा म्हणाले.
कॅमेरात कुठे दिसलं का, की अजित पवारांनी वेगळा युनिफॉर्म परिधान केला आहे. निव्वळ बदनामी सुरु आहे. मला कुठल्या विमानात पाहिलंत.. म्हणे मी दहा वेळा गेलो… अमक्या तमक्याला भेटलो.. मला कुठे जायचं, तर मी उजळ माथ्याने जाईन.. मला लपून छपून कुठे जायची गरज नाही, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.