नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका निवासी संकुलातील एका ४४ वर्षीय महिलेचा तिच्याच फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. मात्र, त्यावेळी कोणालाच याची माहिती नव्हती. शेजाऱ्यांनी इमारतीतून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. इमारतीतील या फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याने बुधवारी सोसायटीचा सुरक्षारक्षक आणि शेजारी दुर्गंधीबाबत विचारणा करण्यासाठी फ्लॅटवर गेले. घराचा दरवाजा ठोठावला असता मुलाने दरवाजा उघडला.
दरवाजा उघडताच आणखीतीव्र दुर्गंधी येऊ लागली. समोर पाहिलं तर महिला मृतावस्थेत पडलेली होती. घरातील स्थिती आणि महिलेचा मृतदेह पाहून लोकांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ खडकपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता त्यांना फ्लॅटमध्ये मुलाच्या आईचा मृतदेह आढळला.
आजाराने आईचा मृत्यू
१४ वर्षीय ऑल्विन डॅनियल हा स्पेशल चाइल्ड आहे. त्याच्या मृत आईचे नाव सिल्व्हिया डॅनियल (वय ४४) होते. दरम्यान, त्याच्या आईचा एका आजाराने मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यात कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नाही. मुलाच्या जबाबानंतर खडकपाडा पोलिसांनी महिलेच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मुलगा मानसिक रित्या कमजोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान शवविच्छेदन अहवालातून हा प्रकार कशामुळे घडला हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.