सर्व ठिकाणी उमेदवार?
‘मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या,’ या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने न्यायालयीन लढ्यात टिकणार नसणारे आरक्षण दिल्याचा जरांगे यांनी आरोप केला आहे. विशेषत: भाजपचा ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध असल्याचे सांगून जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक नसल्याने अखेर विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे.
ऑगस्टअखेर निर्णय
मतदारसंघनिहाय अहवाल पाहून त्या मतदारसंघातील राजकीय, जातीय समीकरण आणि संभाव्य उमेदवाराचा प्रभाव याचा विचार करुन उमेदवारीचा निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांचे अर्ज जरांगे यांनी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सात ते १३ ऑगस्ट या कालावधीत अर्ज घेतले जाणार आहेत. निवडणूक लढवण्याबाबतचा अंतिम निर्णय २९ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी मागील १५ दिवसांपासून अंतरवालीचे दौरे सुरू केले आहेत.
इच्छुकांचे फोटोसह बॅनर
सिल्लोड, गेवराई, बदनापूर, फुलंब्री, अंबड, परतूर, माजलगाव अशा काही मतदारसंघात जरांगे यांच्या फोटोसह इच्छुक उमेदवारांचे बॅनर आणि होर्डिंग्ज झळकत आहेत. ‘फक्त मराठा मतदारांना गृहीत धरून उमेदवारी दिली जाणार नसून, मतदारसंघात असलेले सामाजिक समीकरण समजून घेण्यात येत आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या विरोधातील आक्रमक प्रचाराचा मुद्दाही विचारात घेतला जाणार आहे,’ असे प्रमुख समन्वयकांनी सांगितले.
तिसऱ्या आघाडीची गोळाबेरीज
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर, ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील, प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या आघाडीत कोणकोणते पक्ष आणि संघटना असतील याबाबत स्पष्टता नाही. मात्र, मनोज जरांगे यांना सोबत घेण्यासाठी सर्व नेते प्रयत्नशील आहेत. काही नेत्यांनी अंतरवालीचा दौरा करून प्राथमिक चर्चाही केली आहे; पण जरांगे यांनी कोणताही निर्णय जाहीर केलेला नाही.