किशोर (वय ५६ वर्ष) आणि राजश्री (वय ५४ वर्ष) हे पेडणेकर दाम्पत्य गोरेगाव पश्चिम भागातील टोपीवाला सोसायटीमध्ये वास्तव्यास होते. त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो. राजश्री यांचे मालाड येथे फिजिओथेरेपी क्लिनिक आहे, तर किशोर व्यायामशाळेत साहित्य पुरवण्याचा व्यवसाय करायचे.
सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला शुक्रवारी पहाटे इमारतीखाली किशोर मृतावस्थेत आढळले. त्याने याबाबतची माहिती दिल्यानंतर गोरेगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करताना किशोर यांच्या गळ्यातील चेनमध्ये चावी दिसली. त्याद्वारे पोलिसांनी त्यांच्या तिसऱ्या मजल्यावरील घराचा दरवाजा उघडला. यावेळी राजश्री बेडरूममध्ये मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या गळ्यावर व्रण आढळले आहेत. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवले आहे.
किशोर मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. गुरुवारी मध्यरात्री त्यांनी पत्नीची हत्या करून विष प्राशन केले व त्यानंतर पाचव्या मजल्यावरून उडी मारली. ते थेट जमिनीवर न पडता सोसायटीच्या आवारात असलेल्या एका झाडाच्या फांदीमध्ये अडकसे. मात्र वजनाने ही फांदी तुटून ते खाली पडले व डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणात गोरेगाव पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किशोर पडल्यामुळे झाडाच्या फांद्या तुटल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे. ऑटोप्सी रिपोर्टची प्रतीक्षा असून त्यात दोघांच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यास मदत होईल.
आत्महत्येपूर्वी संदेश
किशोर पेडणेकर यांनी आत्महत्येपूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाला संदेश पाठवला. यामध्ये बँक खात्याचा तपशील, तसेच जीवन संपवत असल्याचे नमूद केले. पोलिसांना घरात विमानाची तिकिटे सापडली असून, किशोर व राजश्री मुलाला भेटण्यासाठी दिल्लीला जाणार होते, अशी माहिती समोर आली आहे.