नागपुरातील पूजा अरुण राजनी ही सावंगी मेघे येथील महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. परीक्षा असल्याने हॉल तिकीट घेण्यासाठी कार्यालयात गेली. महाविद्यालयात ७५ टक्के हजेरी नसल्याने तिला परीक्षेला प्रतिबंध करण्यात आला. यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास तिने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी घेतली. यात गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पूजाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी या घटनेमुळे कॉलेज प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले. शुक्रवारी रात्री कँडल मार्च काढून श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
सावंगी मेघे येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात ‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षाला असलेल्या विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. पूजा अरुण राजनी (रा. नागपूर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, याबाबत चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
शुक्रवारपासून परीक्षा असल्याने पूजा हॉल तिकिटासाठी प्रशासकीय कार्यालयात धडपड करत होती. कॉलेजला ७५ टक्के हजेरी नसल्याच्या कारणास्तव तिला परीक्षेला प्रतिबंध करण्यात आला. पूजासोबत ४५ विद्यार्थ्यांचीही हीच अडचण झाली होती. बुधवारी रात्री तिचे आई-वडील भेटूनही गेले होते. गुरुवारी सकाळी पहिला वर्ग केल्यानंतर ती लायब्ररीत गेली. काही वेळाने ती लायब्ररीच्या वर असलेल्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून तिने खाली उडी घेतली. यातच तिचा मृत्यू झाला.
आत्महत्येपूर्वी पूजाने आई-वडिलांना फोन केला होता. आपल्याला मानसिक त्रास होत असल्याची माहिती तिने दिली होती. सकाळी सोशल मीडियावर तिने ‘आय क्विट’ असा मेसेज केल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. विद्यापीठ प्रशासनाच्या मानसिक त्रासामुळे लेकीने आत्महत्या केल्याचा आरोप पूजाच्या आई-वडिलांनी केला आहे.
दरम्यान, विद्यार्थिनीची आत्महत्या नैराश्यातून झाली आहे. विद्यार्थिनीने इतके टोकाचे पाऊल उचलणे दुर्दैवी आहे. ४५ विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रतिबंध करण्यात आला होता. तसा ‘यूजीसी’चा नियम असल्याचं विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.