केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन सेंट (एनसीओआरडी) समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत शहरातील अमली पदार्थांचे जळजळीत वास्तव समोर आले. या पदार्थांचा वापर रोखण्यासाठी राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डीआयएसएच), अन्न व औषध प्रशासन (एफडीए) यांच्या समन्वयाने विशेष पथके स्थापन करण्याचा आदेश डॉ. दिवसे यांनी दिला.
‘जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील औषधनिर्माण कंपन्या आणि बंद पडलेल्या कारखान्यांची तपासणी करून तेथे अमली पदार्थ आढळल्यास कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध विभागाकडून जिल्ह्यात नऊ पथकांद्वारे कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना अमली पदार्थविरोधी जनजागृती करण्यासाठी मुख्याद्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. कृषी विभागाकडून ग्रामीण भागात गांजा, खसखस इत्यादी मादक पदार्थांची लागवड होऊ नये, यासाठी दक्षता पथके तयार करण्यात आली आहेत,’ असे दिवसे यांनी सांगितले. सर्व विभागांनी अमली पदार्थविरोधी कठोर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी दिला.
जिल्ह्यात अमली पदार्थ तस्करीविरोधी धोरणात्मक बाबींमध्ये समन्वय राहावा, अमली पदार्थांच्या वापरावर आळा घालणे, या व्यसनांबाबत व्यापक जनजागृती करणे, यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीच्या नवीन पद्धतीबाबत; तसेच बेकायदा लागवडीवर या समितीचे लक्ष आहे. जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्ष असून, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिव आहेत.
सात महिन्यांतील कारवाई
विभाग गुन्हे जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत
पुणे पोलिस आयुक्तालय ६९ ३,६७६ कोटी १४ लाख ९० हजार ४७० रुपये
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय ८२ एक कोटी ८० लाख ६० हजार २४९
पोलिस अधीक्षक (ग्रामीण) ३५ ४२ लाख ३० हजार ६२८
पुणे रेल्वे पोलिस २ एक लाख ११ हजार ३१२