मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता यासारख्या विविध विषयांवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
याशिवाय, आरक्षण आणि जातीवाद यासारख्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील पुराबाबात आधीच राज ठाकरेंनी प्रशासनावर ताशेरे ओढले होते, त्याबाबतही बोलण्याचे संकेत मिळत आहेत. तर राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांबाबत दोघांमध्ये चर्चा होऊ शकते. याशिवाय नवी मुंबईतील उरण येथे झालेल्या तरुणीचे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी झाल्याची चिन्हं आहेत.
या बैठकीच्या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, सरचिटणीस संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर, अभिजित पानसे यासारखे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ४ ऑगस्टपासून राज्यभरात नवनिर्माण यात्रा काढण्याची घोषणा शुक्रवारी केली. या दौऱ्याची सुरुवात सोलापूर येथून होणार असून सांगता छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे संबंधित जिल्ह्यातील निरीक्षक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत.
मनसेच्या नुकत्याच पार पडलेल्या पदाधिकारी मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्याचे सुतोवाच केले होते. त्यानंतर शुक्रवारी या दौऱ्याची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली. सोलापूरहून ४ ऑगस्टपासून हा दौरा सुरू होणार आहे. सोलापूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर, राज ठाकरे हे लातूर येथील कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. ७ ऑगस्ट रोजी ते नांदेड, ८ ऑगस्ट रोजी हिंगोली, ९ ऑगस्ट रोजी परभणी, १० ऑगस्ट रोजी बीड, ११ ऑगस्ट रोजी जालना आणि १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर येथे ते दाखल होणार आहेत. संभाजी नगर येथील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते १३ ऑगस्टला संवाद साधणार आहेत. त्यानंतर या दौऱ्याची सांगता होईल, असे जाहीर करण्यात आले.