तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता ट्वीट करत चॅलेंज दिले आहे. सलील देशमुख म्हणाले, फडणवीसांचे काही बगलबच्चे याची नार्कोटेस्ट करा त्याची नार्कोटेस्ट करा अशी मागणी करत आहेत. माझे आव्हान आहे, तुमची सत्ता आहे,करून घ्या, भीती कुणाला दाखवता? वेळोवेळी दिशाभूल करणाऱ्या वाझेवर विश्र्वास ठेवता येणारं नाही, असे हायकोर्टाने सांगितले आहे. तरीही भाजपचे नेते अशा गोष्टी करून कुणाला धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत असा थेट सवाल सलील देशमुखांनी केला आहे.
नेमके फडणवीस – अनिल देशमुख प्रकरण काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी पाठवलेला माणूस सांगलीतील मिरजेतील एनडीएच्या मित्रपक्षाचा पदाधिकारी होता, असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी केला होता. जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष समित कदम यांनी अनिल देशमुखांच्या अधिकृत निवासस्थानी आणि कार्यालयाला भेट दिली, पुढे समित कदम फडणवीसांचा निरोप घेवून देशमुखांच्या भेटीला आले होते असा दावा देशमुखांनी केला आहे.
तर खासदार संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांनी काही माहिती समोर आणताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. याला फडणवीसांनी उत्तर द्यायला हवे, पण उत्तर देण्यासाठी त्यांनी तुरुंगातून प्रवक्ता पाठवला, असे देशात पहिल्यांदा पाहतोय. खून, दहशतवाद यातील एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय, असं टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले आहे.