ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती ४० फुटावरच एका झाडीत अडकली. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. तिला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सहीसलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील खटाव तालुक्यातील पाच मुले व दोन मुली या ठोसेघर सज्जनगड परिसरात सहलीसाठी आले होते. सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ठोसेघरकडे जाताना सज्जनगडापासून पाचशे मीटर अंतरावर तरुणी व तरुण रस्त्याच्या दरीच्या बाजूला सेल्फी काढत असताना देशमुख नामक तरुणीचा तोल जाऊन ती अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती या दरीत चाळीस फूट अंतरावर झाडीत अडकली. या घटनेची माहिती तरुणीच्या मित्रांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले. या टीमने क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत महाबळेश्वर रेस्क्यू टीमही दाखल झाली.
या परिसरात मुसळधार पाऊस असल्याने दरीत उतरणे अवघड होत होते. मात्र, दोराच्या साह्याने जवान दरीत उतरून या तरुणीला बाहेर काढले. या जवानांनी हे रेस्क्यू आज काही तासातच पूर्ण केले आणि तरुणीला जीवदान दिले.
दरीतून बाहेर काढल्यानंतर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, ठोसेघर वन समिती व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. पर्यटन स्थळांवर या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे कास व ठोसेघर पॉईंटवर सातारा तालुका पोलीस चेक पोस्ट कायम ठेवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे.