अनिल देशमुखांच्या खंडणी प्रकरणात वादाची ठिणगी, सचिन वाझेच्या गंभीर आरोपांनंतर भाजपचे मविआवर टीकास्त्र

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ‘देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते. याबद्दलचे पुरावे सीबीआयकडे आहेत. मी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र लिहिलेलं आहे आणि मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे.’ असे सचिन वाझेने म्हटले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर भाजपच्या नेत्यांनी अनिल देशमुखांवर टीकेची झोड उठवली आहे.

नुकताच अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर खळबळजनक आरोप केले होते. देशमुख म्हणाले होते की, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर आरोप करणारी शपथपत्र देण्यासाठी फडणवीसांनी दबाव टाकला होता. यासाठी त्यांनी त्यांचा जवळचा माणूस समित कदमला आपल्याकडे पाठवत शपथपत्र लिहून देण्यास सांगितले. पण त्या दबावाला भीक न घातल्यानं मला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकण्यात आलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलेल्या या आरोपावरुन राजकारण तापले होते. या आरोपाला देवेंद्र फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. याप्रकरणी आता सचिन वाझेने देशमुखांवर पुन्हा आरोप केले आहेत. यामुळे अनिल देशमुखांचे खंडणी प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.

सचिन वाझेंनी केलेल्या आरोपांवर भाजपाच्या नेत्यांनी आता टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आमदार प्रसाद लाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी जो पेन ड्राइव्ह बॉम्ब टाकला होता. त्याचा पुनरुच्चार पुन्हा सचिन वाझेंनी केला आहे. सचिन वाझेंना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद होता. माझी न्यायालयाला विनंती आहे सचिन वाझेंच्या या आरोपाची चौकशी करावी.

आमदार नितेश राणेंनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत देशमुखांना डिवचले आहे. ते म्हणाले, ‘ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांवर आरोप करत अनिल देशमुख पेन ड्राइव्ह नाचवत होते, आता सचिन वाझेंनी जे सत्य सांगितलंय त्याहीबद्दल आम्हाला एक पेन ड्राइव्ह आम्हाला दाखवावा.’

तर भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही देशमुखांवर खोचक टीका केली आहे. ‘सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेत असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे, आता आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी,’ अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

Source link

100 crore caseallegation on anil deshmukhbjp leaders criticizes DeshmukhMaharashtra politicssachin vazeअनिल देशमुखांचे खंडणी प्रकरणभाजपा नेत्यांची टीकामहाविकास आघाडीसचिन वाझेंचे गंभीर आरोप१०० कोटींचे वसुली प्रकरण
Comments (0)
Add Comment