देशाची आर्थिक राजधानी मुंबई व राज्याची उपराजधानी नागपूर, यांना जलदरित्या जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाची उभारणी सुरू आहे. एकूण ७०१ किमीपैकी इगतपुरी ते नागपूर असा एकूण ६२५ किमीचा मार्ग आतापर्यंत वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. उर्वरित मार्ग अंतिम टप्प्यात असताना आता या महामार्गावरील वाहतुकीवर देखरेखीसाठीच्या ‘आयटीएमएस’ या अत्याधुनिक प्रणालीची उभारणीदेखील लवकरच सुरू होत आहे.
‘आयटीएमएस’अंतर्गत महामार्गावर काही ठरावीक अंतरावर कॅमेरे बसवले जातील. ते कृत्रिम प्रज्ञेद्वारे नियंत्रण कक्षाशी जोडलेले असतील. नियंत्रण कक्षाद्वारे वाहनांद्वारे चुकीच्या पद्धतीने रेष तोडणे, मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवणे, चुकीचे ओव्हरटेकिंग करणे आदींवर २४ तास देखरेख ठेवली जाईल. गरज भासल्यास ड्रोन कॅमेरेदेखील महामार्गावर फिरवले जातील. ही यंत्रणा कोरियन तंत्रज्ञानावर आधारित असून, त्यासाठी एकूण एक हजार २५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी मागीलवर्षी काढलेल्या निवीदेला १९ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यामध्ये एनसीसी लिमिटेड व अॅनेक्स इन्फोटेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त कंपनीला कंत्राटदार म्हणून नियुक्ती झाली आहे. या कंपनीने प्रारंभी स्तराचे काम सुरू केले असून, पावसाळ्यानंतर ते पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील संबंधित अधिकाऱ्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिली.
‘एमएसआरडीसी’कडून सल्लागार नेमणुकीची तयारी
या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. तर येत्या महिनाभरात समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पादेखील कार्यान्वित होणार आहे. त्यानुसार महामार्ग पूर्ण रूपात सुरू होताना ‘आयटीएमएस’ची उभारणी सुरू व्हावी, यासाठी ‘एमएसआरडीसी’ने सल्लागार नेमणुकीची तयारीदेखील सुरू केली आहे. या कामावर देखरेखीसाठी ‘एमएसआरडीसी’च्या अभियंत्यांना सल्ला देण्यासाठी हा सल्लागार नियुक्त होणार आहे.
अशी आहे ‘आयटीएमएस’ प्रणाली…
– कोरियन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प
– एकूण अंदाजे खर्च १,२५० कोटी रुपये
– ठरावीक अंतरावर कॅमेरे बसवले जाणार
– हे कॅमेरे कृत्रिम प्रज्ञेद्वारे नियंत्रण कक्षाशी जोडणार
– नियंत्रण कक्षाद्वारे वाहतुकीवर २४ तास देखरेख
– गरज भासल्यास महामार्गावर ड्रोन कॅमेरेदेखील फिरवले जाणार