राज्यातील सत्तेचा मार्ग विदर्भातून जातो. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांचा डोळा या भागातील ६२ जागांवर आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) या जागांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मोठी संख्या असल्याने भाजप व काँग्रेसचे या भागातील नेते अधिकाधिक जागांसाठी आग्रही व आक्रमक आहेत.
जिल्ह्यात विधानसभेच्या बारा जागा आहेत. एकही जागा सोडू नये, अशी ठाम भूमिका भाजपने घेतली आहे. या पाठोपाठ शहरात काँग्रेसही आग्रही आहे. काँग्रेसच्या इच्छुकांना तिहेरी सामना करावा लागणार आहे. स्वपक्षीय प्रबळ दावेदारांचा पत्ता साफ करण्याबरोबर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसरीकडे शिवसेनेसाठी जागा सोडली जाऊ नये, यासाठी मोर्चेबांधणी करावी लागेल. त्यामुळे हळूहळू वातावरण तापणे सुरू झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा भलेही पराभव झाला असला तरी, विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा विश्वास उंचावला आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने पश्चिम आणि उत्तर नागपूर भाजपकडून खेचून आणले. मध्य आणि दक्षिण नागपुरात निसटता पराभव झाला.
शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील कोणत्या जागेवर दावा करते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्ष नागपुरात दावा करून अन्य ठिकाणी जागा वाढवतील, असे मानले जात आहे.
प्रश्नच उद्भवत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) नागपुरातील जागांसाठी आग्रही आहे. पूर्व नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी केली आहे. शिवसेनेकडून दक्षिण आणि पूर्वमध्ये बरेच इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर एकही जागा न सोडण्याचे आव्हान राहण्याची शक्यता अधिक आहे. नागपूर हा काँग्रेसचा गड राहिलेला आहे. पक्षाचे बुथ पातळीवर संघटन आहे. सर्वत्र अनुकूल वातावरण आहे. अशा स्थितीत मतदारसंघ सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगून काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे मित्रपक्षांना जागा सोडण्याचा मुद्दा फेटाळून लावला.