‘दोन वर्षे माणूस शांत असतो. अचानक तो पत्र लिहितो आणि त्याला प्रसिद्धी मिळते. हा योगायोग नाही. वाझे यांना सरकारच्या दयेची गरज आहे. त्यामुळे सरकारला खूश करण्यासाठी त्यांना लिहावे लागत असेल,’ अशी शंका त्यांनी उपस्थित केली. ‘वाझे चालत असताना एका वृत्तसंस्थेचा पत्रकार खोदून खोदून प्रश्न विचारतो, त्याला वाझे उत्तर देतात. हे अनाकलनीय आहे. निवडणूक आहे, त्यामुळे काही लोकांनी साम-दाम-दंड-भेद वापरायचे ठरवलेले दिसते. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. कशासाठी कोण पत्र लिहिते, कुणाच्या सांगण्यावरून लिहिते हे महाराष्ट्रातील जनतेला कळते,’ असेही ते म्हणाले.
‘गृहमंत्री माझे हितचिंतक आहेत. वाझे यांनी काय लिहिले, ते देवेंद्र फडणवीस मला सांगतील, याचा मला विश्वास आहे. कोणी सचिन वाझे यांना प्रवक्ता करीत असेल, तर परिस्थिती आणखी बिकट होईल. एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका एवढीच त्यांना सूचना आहे,’ असा चिमटा जयंत पाटील यांनी नाव न घेता भाजपला काढला.
‘वाझेच्या बंदोबस्तातील
पोलिसांना निलंबित करा’
मुंबई : ‘निलंबित पोलिस अधिकारी व सध्या कैदेत असलेल्या सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नसते, मग वाझे यांनाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी झाली पाहिजे; तसेच वाझे यांच्या बंदोबस्तावरील पोलिसांना हलगर्जीबद्दल तात्काळ निलंबित केले पाहिजे,’ अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.