फ्लड गेटला ब्रेक, मिठीच्या पुराचा धोका कायम, BMC कडून नव्याने निविदा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे या परिसराला पुराचा धोका निर्माण होतो. पूरस्थिती टाळण्यासाठी मिठी नदीला २५ फ्लड गेट (पूरप्रतिबंधक दरवाजे) बसवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या कामासाठी आतापर्यंत चार वेळा निविदा काढण्यात आल्या असून त्यांना प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे निविदांच्या अटीशर्तीत बदल करून लवकरच नव्याने निविदा काढली जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील हे काम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार असल्याने पुराचा धोका कायम आहे.

मिठी नदीला २५ फ्लड गेट बसवण्याचे नियोजन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे. भरतीवेळी समुद्राचे पाणी आत येऊ नये, तसेच पाणी ओसंडून रहिवासी भाग किंवा रेल्वे रुळांवर जाऊ नये, यासाठी माहीम खाडीपासून सुरू होणाऱ्या भरती-ओहोटीच्या क्षेत्रासह अन्य भागांत हे फ्लड गेट बसवण्याचे नियोजन आहे. हे फ्लड गेट लहान आकाराचे असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ मे २०२३रोजी पावसाळापूर्व कामांची माहिती घेताना मिठी नदीसह पम्पिंग स्टेशन आणि अन्य ठिकाणांना भेट दिली होती. त्यावेळी मिठी नदीला फ्लड गेट बसवणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांना दिली होती. मिठी नदी विकासाच्या टप्पा-३ मधील हे काम आहे. मिठी नदीला २५ फ्लड गेट बसवण्यासाठी एक हजार ९५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यातील हे काम पूर्ण करण्यासाठी तीन ते चार वर्षे लागणार आहेत. फ्लड गेट बसवतानाच ७५ मोठे पंप मशिनही बसवण्यात येणार आहेत. यामुळे कुर्ला, माहीमसह मरिन ड्राइव्ह परिसराचीही पाणी तुंबण्यापासून सुटका होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.
IMD Alert : ४ ऑगस्टला पावसाचा जोर राहणार कायम, हवामान खात्याने दिला अलर्ट
या कामासाठी आतापर्यंत चार वेळा निविदा काढण्यात आली. मात्र अटीशर्तींमुळे त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. प्रतिसाद मिळावा, यासाठी काही अटीशर्तींमध्ये बदल करून पुन्हा निविदा काढण्यात येणार आहे. ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने, त्याआधी आचारसंहिता पाहता लवकरच निविदा काढण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. निविदा प्रक्रिया राबवून ती पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागतात. त्यामुळे लवकरच निविदा काढण्याचा प्रयत्न असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कंत्राटदाराला त्याचे आरेखनही सादर करावे लागणार आहे. यंदाच्या पावसाळ्यानंतर हा प्रकल्प सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. मात्र त्याला आता विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Source link

BMCflood gate on riverflood situationmithi riverNews for Mumbaikarनदीचा प्रवाह रोखणेपूरपरिस्थितीचा आढावापूरप्रतिबंधक गेटमिठी नदीमुंबईकरांसाठी महत्वाची बातमी
Comments (0)
Add Comment