Thane News: येऊरच्या जंगलात काळे धंदे; वनविभागाची धडक कारवाई, रसायनांचे ड्रम, सामग्री नष्ट

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर येथील कावेसरमधील राखीव वनक्षेत्रात गावठी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर धडक कारवाई करण्यात आली. वनविभागाने कारवाई करून येथील हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी दारु निर्मितीच्या रसायनांसह प्लास्टिकचे ड्रम जप्त करून रसायनांनी भरलेले दोन ड्रम, झुडपात लपवलेला ब्रॉयलर, पाइप ही सामग्री नष्ट करण्यात आली.

ठाणे जिल्ह्यात गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता वन विभागानेदेखील दारूनिर्मिती करणाऱ्या भट्ट्यांवर कारवाई सुरू केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरमधील जंगलात हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. येऊर कावेसर राखीव वन क्षेत्रावर एका पत्र्याच्या शेडमध्ये गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी गणेश सोनटक्के यांना मिळाली होती. त्याआधारे या अड्ड्यावर छापा टाकून गावठी दारू निर्मितीसाठी लागणारे रसायन व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी दारूभट्टी लावणाऱ्या रमेश सातपुते या इसमावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दारू लपवण्यासाठी क्लृप्त्या

खाडी परिसरातही गावठी दारूच्या हातभट्ट्या उभारुन दारूची निर्मिती केली जात आहे. यापूर्वी अनेकदा पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या असून दोन महिन्यांपूर्वीदेखील उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील खाडी परिसरातील हातभट्टीच्या दारु निर्मिती केंद्रांवर छापे टाकले होते. त्याचबरोबर तस्कर चोरट्या मार्गाने मद्य तस्करी करत असून अन्य राज्यातून चोरीछुपे मद्य आणले जात आहे. गंभीर बाब म्हणजे मद्यसाठा पकडला जाऊ नये यासाठी तस्कर विविध क्लृप्त्यादेखील वापरत आहेत. काही वर्षांपूर्वी असाच एक प्रकार समोर आला होता. तस्करांनी ट्रकच्या आत केबिनमागे बनवलेल्या बॉक्समध्ये मद्यसाठा ठेवून लोखंडी प्लेटने बॉक्स बंद केला होता. जेणेकरून बाहेरून ट्रक रिकामा दिसावा. मात्र, तस्करांची ही चलाखी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी पकडली होती. तरीही मद्य तस्करी रोखण्यासाठी आणखीन ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे बोलले जात आहे.

वनविभागाची मोहीम तीव्र

येऊर वनक्षेत्रातील पानखंडा येथील वन जमिनीवर अतिक्रमण करून बंगले, रिसॉर्ट, गोदामे उभारण्यात आली होती. या भागातही अवघ्या महिन्याभरापूर्वी बुलडोझर चालवून वन विभागाने कारवाई केली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली अंतर्गत येऊर वनक्षेत्रातील ओवाळा राखीव वनक्षेत्र येथील पानखंडा येथे मोठ्या प्रमाणात वन जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले होते. या परिसरात अनधिकृत बंगले, रिसॉर्ट, गोदामे उभारण्यात आली होती. वनक्षेत्रावर होत असलेल्या अतिक्रमणांविरोधात वन विभागाकडे अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांच्या पथकाने अतिक्रमणे निष्कासित केली होती. ही मोहीम पूर्ण होताच दारूभट्ट्यांवर वनविभागाने धाडी टाकल्याने जंगलात अवैध धंदे करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहेत.

कारवाईत सातत्य हवे

येऊर अधिसूचित पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रात सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी असताना पोलिस व प्रशासनाशी संगनमत करून नियम पायदळी तुडवले जातात. याठिकाणी सूर्यास्तानंतरही गावकरी आणि बंगलेमालकांच्या व्यतिरिक्त बिनदिक्कतपणे इतरांची वाहने सोडली जातात, असाही आरोप पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी केला आहे. वनविभागाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत सातत्य हवे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

Source link

liquor storespankhandaThane newsखाडीठाणे पोलीसराज्य उत्पादन शुल्क विभागसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान
Comments (0)
Add Comment