तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. याबाबत उत्तर देताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातल्या दोन महाभागांनी आरोप केले, असे म्हणत पवार-थोरातांवर निशाणा साधला होता. विखेंच्या याच टीकेला थोरात यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल.
बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो, असे थोरात म्हणाले.
रेटकार्ड सांगत विखेंचा थोरातांवर हल्ला
बाळासाहेब थोरात यांच्या काळात रेटकार्ड होतेस असे मी ऐकले आहे. आम्ही तलाठी भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने केली. मात्र, ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे आणि ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नयेत. आपण काचेच्या घरात राहतो हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी टीका विखे पाटलांनी थोरातांवर केली होती.