गुंगीचं औषध देत रोकड लंपास केल्याची तक्रार, मात्र पोलीस तपासात वेगळंच समोर
ज्ञानेश्वर तुकाराम पाटील, वय ५३ हे एमआयडीसीतील अयोध्या नगरात किराणा आणि खाजगी दूध व्यवसाय विक्री करत होते. बँकेतून निघताना गुंगीचे औषध देऊन हात-पाय बांधून त्यांच्याकडील ११ लाख २० हजारांची रोकड लंपास केल्याचा गुन्हाच घडला नसल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली. या व्यावसायिकानेच हा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
ज्ञानेश्वर पाटील हे किराणा दुकान आणि एका खाजगी दुध डेअरीचे वितरक आहेत. त्या डेरीच्या तीन दिवसांच्या उत्पन्नाची रक्कम भरण्यासाठी त्यांनी मंगळवारी ट्रान्सपोर्ट नगरातील बँक ऑफ बडोदातून ११ लाख २० हजार रुपयांची रक्कम काढली. बँकेतून बाहेर पडत असताना अनोळखी व्यक्तीने त्यांना ही बँक आहे का? असं विचारल्यानंतर त्यांची शुद्ध हरपली.
दुसऱ्या दिवशी ते भुसावळ तालुक्यातील खुरे पानाचे येथील नाल्याजवळील शेतात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत आढळले. तर त्यांचा मोबाईल जामनेर तालुक्यात एका व्यक्तीला आढळला होता. याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे आमि त्यांची टीम करत आहेत. मात्र आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना हे अपहरण नसून बनाव असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
हात-पायाला बांधलेली दोरी शेतातील शेण-मातीची
ज्ञानेश्वर पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांना बँकेतून बाहेर पडताना अनोळखी व्यक्ती भेटली. त्यांनी गुंगीच्या औषध दिलं अशी तक्रार केली होती. पोलिसांनी तपासावेळी सीसीटीव्ही फुटेज चेक केलं, त्यात पाटील हे बँकेतून एकटेच बाहेर पडून रस्ता ओलांडत आहेत असं दिसलं. त्यांना ज्या ठिकाणी बांधून ठेवलं होतं, त्यासाठी वापरलेली दोरी शेतातील शेण-माती लागलेली होती हे समोर आलं. अपहरण करताना सोबत दोरी आणली असावी. त्यांचा मोबाईल जामनेरजवळ सापडला. या मोबाईलचं लोकेशन हे जळगावपासून पाटील यांच्या सोबतच असल्याचं रेकॉर्ड सांगतं. त्यामुळे हा अपहरणाचा बनाव असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.