जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्रिशक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीस खासदार बळवंत वानखडे, आमदार बच्चू कडू, आमदार रवी राणा, आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते.
यावेळी आमदार रवी राणा यांनी उभे होऊन चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन केले. अचलपूर येथील फिनले मिल गत अनेक वर्षापासून बंद असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २० कोटी रुपये मंजूर केल्यामुळे मिल पुन्हा सुरू होत आहे, असे ते म्हणाले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी यास विरोध केला. तुमच्या खासदारकीच्या काळात मिलसाठी किती निधी आणला, याशिवाय बडनेरा मतदारसंघातील मिलचा प्रश्न सुटला काय असा प्रश्न त्यांनी केला. यामुळे सभागृहात तणाव निर्माण झाला होता.
बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक शांततेने सुरू आहे. त्यामुळे दोन्ही आमदारांनी शांततेने व संयमाने बोलावे असे सुचविले. फिनले मिलच्या श्रेयावरून आमदार राणा यांनी अचानकपणे विधान केल्याने बच्चू कडू यांनी देखील पलटवार केला. त्यामुळे बैठक काही वेळाकरिता राजकीय आखाडा झाली होती.
बडनेरा मतदारसंघातील विजय मिल व अन्य एक मिल बंद आहे. यासाठी राणा दाम्पत्याने कोणतेच प्रयत्न केले नाही. परंतु, आपण सातत्याने फिनले मिलसाठी पाठपुरावा करीत असून त्याचे श्रेय मात्र ते घेत आहेत – आमदार बच्चू कडू
फिनले मिलचे कामगार अनेक वर्षांपासून बेरोजगार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. माजी खासदार नवनीत राणा व आपण स्वतः या मिलसाठी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे- आमदार रवी राणा