आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपुरात भाजपने जिल्हा महाअधिवेशन आयोजित केले होते. जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची अधिवेशनाला उपस्थिती होती. येत्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा जिंकण्याचा निर्धार अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वैचारिक फवारणी आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाषणातून मांडले. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीला मुनगंटीवार यांनी जबर टोले लगावले. महाविकास आघाडीचे नेते स्वपक्षाच्या बैठकीत योजनेच्या विरोधात गरळ ओकत आहेत. शहरातील चौकात मात्र लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मिळण्यासाठी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. ही योजना कुणीही बंद करू शकणार नाही. योजना सुरू केल्याबरोबर महाविकास आघाडीचे नेते अर्थतज्ञ झाले असून त्यांना महाराष्ट्राची आर्थिक चिंता सतावू लागली आहे. त्यांनी महाराष्ट्राची चिंता करू नये असा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिला.
काँग्रेस पक्षाला ‘ रावण पार्टी ‘ ची उपाधी…
महाअधिवेशनात बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला ‘ रावण ‘ पार्टी म्हटलं. रामायणात बेसावध अवस्थेत लक्ष्मण काही क्षण बेशुद्ध झाला म्हणून प्रभू रामाची पार्टी कमजोर झाली अस रावणी पार्टीने विचार केला असेल तर याद राखा आमच्या प्रत्येक कार्यकर्ता हनुमानाची शक्ती घेऊन काम करणारा आहे. पुन्हा एकदा रावण पार्टीला झटका, फटका, पराभव, करंट देण्याची शक्ती भारतीय जनता पार्टीत असल्याचा इशारा मुनगंटीवार यांनी विरोधकांना दिला.
राहुल गांधीची विचारधारा देशाचे तुकडे करण्याची..
या देशावर मोठ संकट आलं आहे. ते संकट आहे दृष्ट विचाराच्या शक्तींचं. लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाकडे केवळ भाषण म्हणून बघू नका.ही तर देशाचे तुकडे तुकडे करण्याची सुरुवात आहे. हाच विचार आहे, जाती जातीत द्वेष लागावे.जाती जातीत द्वेष लावताना मला भीती आहे.लाकडाला लागलेले किडे पूर्ण खुर्ची खाऊन टाकतात.पण ज्या नेत्यांचा डोक्यात किडे लागतात ते नेते पूर्ण देश खाऊन टाकतात.काही डोक्याना किडे लागले आहेत. ते संसदेत भाषण देत आहेत.जाती जातीत विष घेऊन फिरत आहेत.कानात विषारी विचार गेलेल्या नेत्याला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादाचे देशभक्तीच वॅक्सिन अशा लोकांपर्यंत पोहोचावं लागेलं,अशी विखारी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.