शेट्टी यांनी मराठवाड्यातील ऊस, कापूस, तूर, सोयाबीन व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी टोपे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवावी, असा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठराव केला. उसाच्या आडून टोपे यांची कारखानदारी राजकीय मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी निवडणूक लढवावी, असे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे म्हणाले.
मराठवाड्यात ऊस,कापूस,तूर व सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. गोदावरी नदीकाठच्या परिसरात मोठा ऊस पट्टा आहे. या परिसरात अनेक साखर कारखाने आहेत. मात्र ते कारखाने शेतकऱ्यांना योग्य दर देत नाहीत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, असे काळे म्हणाले. नामदेव खोसे, शिवाजी भोसले, गणेश राजबिंडे, सुभाष भोपळे, अंकुश तारख, बाबासाहेब दखणे, पांडुरंग गटकळ, उमेश पाष्टे, गोपाल खोमणे, गजानन भोपळे, नामदेव निहाळ उपस्थिती होते.
लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा पराभव
दोन महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते खासदार धैर्यशील माने यांनी पराभव केला. सलग दुसऱ्यांदा माने यांनी राजू शेट्टी यांना पराजयाची धूळ चारली. लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा लढण्याची सुप्त इच्छा शेट्टी यांच्या मनात आहे. कार्यकर्तेही त्या दृष्टीने तयारीला लागले आहे. दरम्यान, राजू शेट्टी यांच्याकडून विधानसभेच्या जागेची चाचपणी सुरू आहे.