जिल्हा रायगडमधील महाड येथून संदीप झानजे यांच्यासह १० जणांचा ग्रुप केदारनाथ येथे यात्रेसाठी गेले होते. त्यापैकी ८ जण हरिद्वार येथे सुखरूप पोहाचले आहेत. गोपाळ पांडुरंग मोरे आणि सुदाम राजाराम मोरे हे केदारनाथ मंदिराजवळील हेलिपॅड येथे अडकले आहेत. त्यांचे समवेत महाराष्ट्रातील इतर साधारण १२० नागरिक त्याठिकाणी अडकले आहेत. यामध्ये महाड येथील दहा ते बारा जण सुरक्षित आहेत. खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करू शकत नसल्याने सगळे थांबून आहेत. रायगड जिल्हा प्रशासनाने त्यांच्याजवळ संपर्क साधला असून सगळे सुखरूप असल्याची माहीत प्रशासनाने दिली आहे.
हवामान खराब असल्यामुळे यात्रेकरूंना हेलिकॉप्टर द्वारे प्रवास करता येत नाही. सर्व जण सुरक्षित असून टप्प्या टप्प्याने यात्रेकरूंना खाली सोडण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला असून आज रात्रीपर्यंत सर्वांना बाहेर काढण्यात येईल, असे कळविले आहे. तथापि, आवश्यक वैद्यकीय व इतर मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे अशी माहिती रायगड जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
८८२ जवान बचावकार्यात
केदारनाथमध्ये या आपत्तीतून लोकांना वाचवण्यासाठी ८८२ जवान बचावकार्य राबवत आहेत. वाचवण्यात आलेल्या लोकांना जवानांकडून जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच, लोकांना रेस्क्यू करुन त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. जर, हवामान योग्य राहिलं तर आज सर्व भाविकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण, या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.