प्रवीण माने पवारांच्या पक्षात, आप्पासाहेब जगदाळेंचं काय? इंदापुरात कोणाची वर्णी लागणार?

इंदापूर: पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती व राज्यातील सर्वात मोठा दूध प्रक्रियेचा ब्रँड असलेल्या सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली. प्रवीण माने यांच्या पक्षातील येण्याने पक्ष बळकट झाला असला, तरी अनेक प्रश्न देखील जोडीला निर्माण झाले आहेत. हे तेच प्रवीण माने आहेत, ज्यांनी सुप्रिया सुळे यांची साथ अर्ध्यावर सोडली, काही दिवसातच पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष गाठला. आता हेच माने पुन्हा शरदचंद्र पवार यांच्या पक्षांमध्ये आल्यामुळे, माने यांना नेमकी कोणती ताकद मिळणार याची चर्चा सध्या सुरू आहे.

इंदापूर तालुक्यात दिवसेंदिवस राजकारण वेगवेगळ्या वळणावर जाताना पाहायला मिळत आहे. एकेकाळचे अजित पवारांचे सहकारी, माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे जवळचे मित्र आणि हर्षवर्धन पाटलांचे मामा आप्पासाहेब जगदाळे यांनी या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांची खिंड लढवली आणि सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मताधिक्य मिळाल्याने त्याचे काही प्रमाणात श्रेय आप्पासाहेब जगदाळे यांना ही मिळाले. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे यांनी देखील आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद पवार पक्षाच्या वतीने इंदापूरची विधानसभा लढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे प्रवीण माने देखील शर्यतीत आहेत. प्रवीण माने सन २०१९ मध्येच या शर्यतीत होते मात्र त्यांना संधी मिळू शकली नाही.

आता इंदापूर तालुक्यात महायुतीची जरी युती कायम राहणार असली, तरी हर्षवर्धन पाटलांनी देखील बंडाचे निशाण फडकवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे अशा पारंपारिक लढतील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून आप्पासाहेब जगदाळे असणार की प्रवीण माने? याची देखील चर्चा आणि आडाखे आता बांधले जाऊ लागले आहेत.

इंदापूरची उमेदवारी या दोघांपैकी कोणाला मिळणार? याची चर्चा आता कार्यकर्ते करू लागले आहेत, मात्र जर आप्पासाहेब जगदाळे यांना वगळून प्रवीण माने यांना संधी दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नैतिकतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाईल. अत्यंत मोक्याच्या क्षणी अर्ध्यावर साथ सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्याला जर पुढे जाण्याची संधी दिली, तर प्रामाणिक कार्यकर्त्यांवरती अन्याय होऊ शकतो ही भावना आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Source link

Indapurpravin mane appasaheb jagdalePuneSharad PawarVidhan Sabha Electionअप्पासाबेह जगदाळेइंदापूरप्रवीण मानेशरद पवारशरद पवार पक्ष
Comments (0)
Add Comment