Mahayuti: मैत्रीदिनीच भिडले महायुतीतील मित्र; मुंबई-गोवा महामार्गावरुन शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

म. टा. वृत्तसेवा, कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून राजकारण तापू लागले आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देत मुंबई-गोवा महामार्गाचे काम हाती घेण्याची मागणी करत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना डिवचले. यावर रविवारी भाजपने प्रत्युत्तर देताना, ‘खाजवून खरूज काढणारे राजकारण करू नका. नेत्यावरची टीका सहन केली जाणार नाही,’ अशा शब्दांत सुनावले. एकूणच शिवसेना-भाजपमध्ये चांगलीच हमरी-तुमरी रंगली आहे. मैत्रीदिनीच तोंडदेखली मैत्री जपणारे मित्र आपसात भिडल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे यंदाही गणपतीभक्तांना खड्ड्यांमधून प्रवास करावा लागणार आहे. हीच संधी साधत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी या महामार्गाचे काम खासदारांनी हाती घ्यावे आणि इतर प्रकल्पांप्रमाणे हे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी करत भाजपला डिवचले. हा मार्ग मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अखत्यारीत येत असल्याने भाजपकडून कदम यांचा निषेध करत प्रत्युत्तर देण्यात आल्याने, कल्याण पूर्वेतील वादानंतर आता डोंबिवलीतही शिवसेना भाजपमध्ये धुसफूस सुरू झाल्याचे दिसत आहे. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला असला, तरी हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी शिवसेनेचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून शिवसेनेचे स्थानिक नेते मंत्री चव्हाण यांच्यावरील टीकेची एकही संधी सोडत नसल्याने भाजपनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कदम यांच्या पोस्टला उत्तर देताना, भाजपचे नेते शशिकांत कांबळे यांनी आम्ही वरिष्ठाचा मान राखत महायुतीत वितुष्ट येऊ नये, यासाठी कोणतेही वक्तव्य टाळत असताना, कदम यांनी महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तर डोंबिवलीत विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या कदम यांनी तसे वरिष्ठांशी थेट बोलावे उगाच तिरकस राजकारण करू नये. सुरुवात तुम्ही केलीत, तर शेवट आम्ही करणार, आमच्या नेत्यावर आरोप करणाऱ्यांना सोडणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तर याला प्रत्युत्तर देताना कदम यांनी, ‘आम्ही केवळ आमच्या व्यथा आमच्या वरिष्ठांकडे मांडल्या. यात आरोप-प्रत्यारोपाचा प्रश्न नाही. कोकणवासींना या खड्ड्यांचा कसा त्रास होतो हे या रस्त्यांवरून प्रवास करून पाहा,’ असा पलटवार केला आहे. मात्र, यामुळे डोंबिवलीतील शिवसेना-भाजपमधील वाद रंगू लागल्याचे दिसत आहे.
Dombivli Vidhan Sabha: डोंबिवली विधानसभेत राजकीय बदलाचे संकेत, मतदारसंघावरील शिवसेनेच्या दाव्याने महायुतीत संघर्ष?
कुरघोड्यांचे राजकारण


लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला मदत केल्यानेच महाराष्ट्रातील वातावरण विरोधात असतानाही खासदार शिंदे दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून आल्याचा भाजपचा दावा आहे. तर दुसरीकडे भाजपने प्रत्यक्षात काम केले नसल्यानेच अपेक्षित मताधिक्य गाठता आले नसल्याचा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. यामुळेच विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत कुरघोड्यांचे राजकारण विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Source link

Kalyan newsmahayuti governmentmumbai goa highway newsrajesh kadamshivsena vs bjpshrikant shindeकल्याण-डोंबिवली मतदारसंघरवींद्र चव्हाणविधानसभा निवडणुका २०२४
Comments (0)
Add Comment