नंदपुर गावातील गावाजवळून जाणाऱ्या नदीच्या दुसऱ्या बाजूला गावातील नागरिकांच्या शेती आणि स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतं. नदी दोरीच्या साह्याने किंवा होडीच्या साह्याने पार करावी लागत असते. गावात एखाद्याची मयत झाली तर गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते. गावातील एका अंत्यविधीसाठी करावी लागणारी कसरतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
गर्भवती महिलेसाठी खाटेची कावड
दरम्यान, स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर देखील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात विविध आजाराचे रुग्ण आणि गरोदर मातांना याचा जबर फटका बसत आहे. जिल्ह्यातील कोरची तालुक्यात असंच एक विदारक चित्र समोर आलंय. कोरची तालुक्यातील चर्विदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूतीकळा आल्याने तिला खाटेचा कावड करून दोन किलोमीटर पायपीट करण्याची नामुष्की गावकऱ्यावर ओढवली. रोशनी शामराव कमरो (वय २३) असे त्या गर्भवती महिलेचं नाव आहे.
हा प्रवास करत असताना बेळगाव ते पुराडा दरम्यान असलेल्या घाटामध्ये दोन ट्रक बिघाड झाल्याने उभे होते. त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. अखेर तिला रुग्णवाहिका बोलावून पुढे नेण्यात आले. या कठीण प्रवासानंतर महिला रुग्णालयात दाखल झाली. मात्र प्रसूतीनंतर जन्मलेले बाळ दगावल्याचे आढळून आले.