आदिवासी कुटुंबातील सख्ख्या भावांची कमाल, एकत्रच PSI झाले, गावात बँडच्या तालावर मिरवणूक

धनाजी चव्हाण, परभणी : आदिवासी कुटुंबातील दोन भावंडे एकाच दिवशी पीएसआय झाली आहेत. खाकी विषयी असलेले आकर्षण आणि दोन्ही भावांनी जिद्दीने केलेला अभ्यास, यामुळे घरची हलाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या दोन्ही भावंडांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.

अल्पभूधारक शेतकरी असलेल्या मधुकर कणके (राहणार शिरशी खुर्द, तालुका परभणी) हे आदिवासी प्रवर्गातून आहेत. त्यांना गजानन कणके आणि कृष्णा कणके अशी दोन मुले आहेत. दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे लोहगाव येथील नरसिंह विद्यालयात पूर्ण झाले. घरची हलाखीची परिस्थिती असताना देखील मुलांच्या शिक्षणावर मधुकर कणके यांनी चांगलेच लक्ष दिले होते.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गजानन कणके आणि कृष्णा कणके या दोन्ही भावंडांना खाकी विषयी आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी परभणी येथे येऊन पोलीस भरतीची तयारी सुरू केली. त्या दरम्यान त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पण परभणी येथे चांगले क्लासेस उपलब्ध नसल्याने या दोघांनीही छत्रपती संभाजी नगर गाठले.
Dhule News: मुलाची मेहनत, वडिलांचं प्रोत्साहन, बाप अन् लेक एकाच दिवशी PSI, धुळ्यातील पानपाटलांची पंचक्रोशीत चर्चा
२०२२ पासून छत्रपती संभाजी नगर येथे खाजगी क्लासेस मध्ये त्यांनी पीएसआय पदासाठी तयारी सुरू केली. मोठा भाऊ गजानन कणके हा सहा महिन्यापूर्वी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून वन विभाग नागपूर येथे लेखापाल पदावर नियुक्त झाला. तरी देखील दोघी भावंडे पीएसआयची तयारी करत होती. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला पोलीस अधिकारी व्हायचे आहे, ही खूणगाठ दोन्ही भावांनी मनात पक्की केली होती. त्यामुळे त्यांनी तयारी देखील उत्तम केली होती.

त्याचाच परिणाम नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये दिसला. दोन्ही भावंडे पीएसआय झाली आहेत. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नामध्ये या दोन्ही भावंडांना यश मिळाले आहे.

अल्पभूधारक असलेल्या मधुकर कणके यांची गजानन कणके आणि कृष्णा कणके ही दोन्ही मुले आता पोलीस अधिकारी झाली आहेत. गावकऱ्यांना देखील त्यांचे प्रचंड कौतुक होत आहे. काल सायंकाळी जेव्हा ही दोघेही गावामध्ये पोहोचली तेव्हा गावकऱ्यांनी बँड बाजा लावून गावामधून त्यांची भव्य मिरवणूक काढली आहे.

आदिवासी कुटुंबातील दोन्ही मुले पोलीस अधिकारी झाल्याने परभणी जिल्हाभरामध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे. खाकी वर्दीचे आकर्षण आणि पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न आम्हाला या पदापर्यंत पोहोचू शकले असेही गजानन आणि कृष्णा हे दोन्ही भावंडं सांगत आहेत.

Source link

Gajanan KanakeKrishna KanakeParbhani Success StoryPolice sub inspectorTribal brothers became PSIआदिवासी भाऊ पीएसआयपोलीस भरतीसख्खे भाऊ पोलीस अधिकारीसख्खे भाऊ पोलीस उपनिरीक्षक
Comments (0)
Add Comment