येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. संदीप नाईक यांनीही कामाचा सपाटा सुरू केला आहे. विशेष म्हणजे बेलापूरमध्ये त्यांनी त्यांचे पक्ष कार्यालयही सुरू केले आहे. विविध कार्यक्रम राबवून जनसंपर्क वाढवण्याचे काम केले जात आहे.
बेलापूरवर बोलताना संदीप नाईक म्हणतात…
बेलापूर विभागात त्यांचे काम वाढले असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याबाबत त्यांनी भूमिका मांडली. ‘स्थायी समिती सभापती म्हणून सर्वाधिक काम बेलापूर शहरात केले. या भागातील बहुसंख्य कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. तीनवेळा स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. या काळात बेलापूर शहरासह संपूर्ण नवी मुंबईमध्ये अनेक मूलभूत आणि पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या. दूरगामी विकासाचे निर्णय घेतले. पालिकेचा पर्यावरणपूरक अर्थसंकल्प मांडणारा मी पहिला सभापती होतो. ‘स्कूल व्हिजन’ अंतर्गत महापालिका शाळांच्या इमारती प्रशस्त बनवल्या आणि त्यामधून आधुनिक डिजिटल शिक्षणाचे पर्व सुरू केले,’ अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
झोपडपट्टी सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर संदीप नाईक म्हणाले…
सध्या झोपडपट्टी सर्वेक्षणाचा मुद्दा शहरात गाजत आहे. याबाबतही त्यांनी भूमिका मांडली. ‘प्रकल्पग्रस्तांची घरे त्यांना मालकी हक्क देऊन नियमित झाली पाहिजेत. प्रकल्पग्रस्तांना हवी तशी योजना सरकारने जाहीर केली पाहिजे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध नाही. आजतागायतच्या सर्व झोपडीधारकांना जमिनीची मालकी देऊन त्यांना योजनेत घरे मिळाली पाहिजेत,’ असे ते म्हणाले.
मी तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण? मंदा म्हात्रे यांचा संदीप नाईक यांच्यावर वार
मी तुझ्या बापाला पाडलंय, तू कोण? अशा इशाराच बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना दिला होता. मंदा म्हात्रे या बेलापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. असे असतानाही संदीप नाईक यांनी बेलापूरमध्ये कार्यालयाचे उद्घाटन करून आमदारकीची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना इशारा दिला.