भीमा नदीतून सोमवारी सुमारे १ लाख ६० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता. नदीकाठी कर्जत तालुक्यातील जलालपूर, सिद्धटेक, बेर्डी, भांबोरा, शिंपोरा, गणेशवाडी, खेड व नदीकाठच्या इतर गावांना पुराच्या पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलिस, महसूल व आपत्कालीन विभागाची पथके तैनात करण्यात आली आहेत. आमदार पवार यांचा हा मतदारसंघ आहे. त्यांनी या समस्येकडे लक्ष वेधताना म्हटले आहे, ‘उजनी धरणात येणारे पाणी आणि धरणातील विसर्ग हे प्रमाण व्यस्त आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे.
यासंदर्भात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असला तरी अद्याप हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. अचानक विसर्ग वाढविल्यास धरणाच्या खालच्या भागातही अडचण येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने योग्य पूर्वनियोजन करावे,’ अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील पूल पाण्याखाली गेल्याने नगर व पुणे जिल्ह्याचा संपर्क तुटला असून भाविकांचीही मोठी गैरसोय झाली आहे. पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने पुणे- मुंबई भागातून या मार्गाने येणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी येण्यात अडचण निर्माण झाली आहे.
पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, तहसीलदार बिराजदार यांनी सिद्धटेक येथे जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी सिद्धटेक येथील पुलावर तैनात करण्यात आले आहेत. भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.