प्रवीण भगवान कांबळे (वय ३६, रा. जय प्रकाशनगर, येरवडा) याने फिर्याद दिली आहे. त्यावरून चार तरुणांवर खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदा हत्यारे बाळगणे आणि दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार सुधीर चंद्रकांत गवस (वय २५, रा. जय प्रकाशनगर, येरवडा) याचा १७ जुलै रोजी खून झाला होता. परिसरात राहणाऱ्या आचार्य कुटुंबासोबत त्याचा वाद होता. त्यातून हा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण आचार्य, स्वप्नील आचार्य आणि रवी आचार्य यांना अटक केली होती. यावरून गवसचा भाऊ आणि त्याचे साथीदार चिडून होते.
सोमवारी रात्री जेवण करून फिर्यादी कांबळे हे परिसरात शतपावली करीत होते. त्या वेळी चार तरुण हातात कोयते घेऊन जय प्रकाशनगरमध्ये शिरले. रस्त्याच्या कडेला उभारलेल्या रिक्षा आणि दुचाकी वाहनांवर तरुणांनी हत्यारांनी वार करून तोडफोड सुरू केली. वाहनांच्या तोडफोडीचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर आले.
पण तरुणांच्या हातात धारधार हत्यारे पाहून कोणीही पुढे जाण्याचे धाडस केले नाही. नागरिकांना पाहून तरुणांनी हत्यारे हवेत भिरकावत दहशत माजवली. या वेळी रस्त्यावर शतपावली करणाऱ्या कांबळे यांच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी निघून गेले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना पसरली आहे.
जय प्रकाशनगरमध्ये चार जणांच्या टोळक्याने हत्याराने वाहनांची तोडफोड करून हवेत हत्यारे भिरकावून परिसरात दहशत माजवली. एकावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. – रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे