भाजपने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचेही भाजपाने राजकारण केले. सुशांतसिंह याने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते. अत्यंत प्रथितयश म्हणून मान्यता प्राप्त अशा ‘एम्स’ या संस्थेने त्यांच्या अहवालात आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले. त्याला आता १४०० दिवस उलटले आहेत. भाजपने केवळ हीन राजकीय हेतूने मुंबई पोलीस, मविआ सरकारची बदनामी केली व सुशांतसिंहच्या कुटुंबियांनाही वेठीस धरले. तीन तीन तपास यंत्रणांचा वापर करण्यात आला. अनेकांचा तपासात छळही केला, असे सचिन सावंत म्हणाले.
मोदींनी या प्रकरणात ना हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले
सुशांतसिंह प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सीबीआयला तोंड उघडायला लावावे, अशी विनंती सुशांतच्या मोठ्या बहिणीने केली. परंतु अद्याप मोदींनी या प्रकरणी ना हस्तक्षेप केला ना सीबीआयचे तोंड उघडले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येस आज १४६० दिवस झाले पण सीबीआय तोंड कधी उघडणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.
भाजपकडून बिहार निवडणुकीत सुशांतच्या मृत्यूचा वापर, काँग्रेसकडून समाचार
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासाबद्दल समाधान व्यक्त केले होते. परंतु मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा आणि मविआ सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा राजकीय डाव होता. बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांचा याकरिता वापर केला गेला. भाजपाने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन खुलेआमपणे खून, बलात्काराचे आरोप केले व बिहार निवडणुकीतही सुशांतच्या मृत्यूचा वापर केला. मविआ सरकारवरील सुनियोजित राजकीय हल्ल्याची रणनीती आखून भाजपा संचलित वृत्त वाहिन्यांना सुशांतसिंहचा खून झाल्याचा सातत्याने उच्चार करण्यास सांगितले गेले. भाजप आयटी सेलने हजारो बनावट ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब अकाउंट तयार करून अपप्रचार केला, असेही सचिन सावंत यांनी म्हणाले. याच पद्धतीने पालघर साधूंच्या हत्येचा तपासही थंड बस्त्यात आहे, असे सावंत म्हणाले.