राज ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर जाण्यापूर्वी सोलापुरात मुक्काम केला होता. सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधत वरळी विधानसभा उमेदवाराबाबत ग्रीन सिग्नल दिला आहे. राज ठाकरे यांचे पुतणे तथा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभेची निवडणूक लढवणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
पुतण्याबाबत प्रश्न विचारताच…
पुतण्याबाबत प्रश्न विचारताच राज ठाकरेंनी ओळख दिली नाही. ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे पहिलेच सदस्य ठरले होते. वरळी विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरत ते निवडूनही आले होते. मात्र पुतण्याविषयी प्रश्न विचारताच कोण कुठे कोणत्या मतदारसंघात उभा आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. आम्हाला ज्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार आहोत, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंचा संदीप देशपांडेंच्या नावाला अप्रत्यक्ष होकार
२००९ मध्ये वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यावेळी मनसेला वरळी मतदारसंघातून ३६ ते ३८ हजार मतं मिळाली होती. यावेळी मनसे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना वरळी विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिले जाण्याची चर्चा आहे. त्याबाबत राज ठाकरे यांनी होकारार्थी उत्तर देत विधानसभा निवडणुकीसाठी वरळीचा उमेदवारही निश्चित झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत वरळीत आदित्य ठाकरे यांना मनसेचे संदीप देशपांडे टक्कर देणार हे निश्चित मानले जात आहे.