ललिता कायी यांची मानसिक स्थिती अस्थिर आहे. त्यातूनच त्यांनी हे कृत्य केलं असल्याची दाट शक्यता आहे. एका गुरख्यानं २७ जुलैला जंगलात महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्या आवाजाचा त्यानं काढला. त्यावेळी एक परदेशी महिला साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत त्याला दिसली. तिची प्रकृती अगदीच तोळामासा झालेली होती. त्यानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तिची सुटका करुन तिला रुग्णालयात दाखलं.
सिंधुदुर्ग पोलिसांनी शनिवारी ललिता कायी यांचा जबाब नोंदवला. ‘मीच तीन कुलपं आणि लोखंडी साखळी आणली होती. त्यातील एका कुलपाच्या आणि साखळीच्या मदतीनं मी स्वत:ला सोनुरली गावाजवळ असलेल्या एका जंगलातील झाडाला बांधून घेतलं,’ असं ललिता कायी यांनी पोलिसांना सांगितलं. तिच्याजवळ पोलिसांना अमेरिकन पासपोर्टची फोटोकॉपी आणि आधार कार्ड सापडलं. त्यावर तमिळनाडूचा पत्ता होता. मुदत संपलेल्या अमेरिकेचा व्हिसादेखील तिच्याकडे सापडला.
ललिता यांची सुटका करताना पोलिसांना तिच्यापासून काही अंतरावर लोखंडी साखळी बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या कुलपाच्या दोन चाव्या सापडल्या. मला पतीच नसल्याचंही ललिता यांनी त्यांच्या कबुलीत म्हटलं. ललिता यांची आई अमेरिकेत वास्तव्यास आहेत. पण त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं अद्याप पोलिसांकडे संपर्क साधलेला नाही. ललिता यांच्यावर रत्नागिरीतील रुग्णालयात मानसोपचार विभागात उपचार सुरु आहेत.
कधी कधी महिला भ्रमिष्ट होते. त्याच अवस्थेत तिनं पतीनं आपल्याला जंगलात बांधून ठेवल्याचं सांगितलं असावं, असं पोलीस अधिकारी म्हणाले. याआधीच्या जबाबात महिलेनं आपण तमिळनाडूतील एका व्यक्तीशी लग्न केल्याचं सांगितलं होतं. ‘पतीनं मला इंजेक्शन दिलं आणि जंगलात आणून बांधलं. त्यानंतर पती मला जंगलात सोडून निघून गेला. मी ४० दिवस काहीही न खाता जंगलात होते,’ अशी माहिती महिलेनं आधीच्या जबाबात दिली होती.