आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मनोज जरांगे पाटील यांचा राज्यभर शांतता रॅलीच्या माध्यमातून दौरा सुरू आहे. या रॅलीचे काही टप्पे पूर्ण झाले असून, पुढचा टप्पा बुधवारी (दि.७) ऑगस्टपासून सुरू होतो आहे. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर मार्गाने ही रॅली समारोपासाठी १३ ऑगस्टला नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. मराठा समाजाला ओबीसीतून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळावे, सगेसोयरे अधिसूचनेचा कायदा करावा या प्रमूख मागण्यांसाठी जरांगे पाटील यांचा हा दौरा असून, त्याचा समारोप नाशिकमध्ये होत आहे. ही रॅली अभूतपूर्व व्हावी याकरीता मराठा समाज एकवटला असून वेगवेगळ्या समित्यांच्या माध्यमातून नियोजन सुरू करण्यात आले आहे. जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.५) नांदूर नाका येथील साई लिला लॉन्समध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. बैठकीला करण गायकर, नाना बच्छाव, विलास पांगरकर, माजी आमदार अनिल आहेर, अॅड. शिवाजी सहाणे, चंद्रकांत बनकर, विलास जाधव, बालाजी माळोदे आदींनी सूचना मांडल्या. बैठकीला शहरासह जिल्हाभरातील मराठा समाज बांधवांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींना वेगवेगळ्या समित्यांमध्ये घेऊन त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. जिल्हा संयोजन मुख्य समितीच्या निर्णयाचाही एकमुखी ठराव करण्यात आला. रॅलीमध्ये अधिकाधिक बांधवांनी सहभागी व्हावे याकरीता मुख्य समितीचा जिल्हा दौरा सुरू होणार आहे.
समाजबांधवांनी रॅलीत सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर यांनी केले. दौऱ्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी अॅड. स्वप्ना राऊत यांच्यासह पाच वकिलांची कमिटी बनविण्यात आली आहे. ज्या समाज बांधवांना कमिटीमध्ये काम करायचे असेल त्यांनी आपली नावे व मोबाइल क्रमांक कालिदास कला मंदिर येथील वॉर रूम येथे नोंद करावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आल्या. मध्यवर्ती शहर समिती, सोशल मीडिया समिती, तालुका समित्या, वाहनतळ व्यवस्था समिती, आरोग्य सेवा, सुशोभीकरण समिती, सुरक्षा समिती अशा वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. तपोवनापासून रॅलीला सुरूवात होणार असून ही रॅली सिबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत येणार आहे.
समितीकडून या सूचना
– विविध संयोजन समितीत समाजातील कृतिशील व्यक्तिंनी स्वतःहून यावे
– तालुक्यातील समित्यांनी बैठका घ्याव्यात
– वाहतूक, झेंडे, स्टिकरचे नियोजन करावे
– शहरातील पुतळ्यांची स्वच्छता करावी