दरम्यान आजच्या सुनावणी वेळी कोणताही कायदा व सहसा प्रश्न निर्माण होणे म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता तर न्यायालय परिसरात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचे कुटुंबीय दाखल झालेले होते.
विशाळगडावरील अतिक्रमण मुक्त करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी १४ जुलै रोजी चलो विशाळगडचा नारा दिला होता त्यानुसार हजारो शिवभक्त व आंदोलक विशाळगडाकडे आले होते मात्र यावेळी या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले होते. आणि विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या आणि अतिक्रमणाशी कोणताही संबंध नसलेल्या गजापूर गावात दगडफेक, तोडफोड करण्यात आली होती. यामध्ये घरे, दुकानांसह मशिदीला लक्ष्य करत आंदोलकांनी नासधूस केली. यानंतर शाहूवाडी पोलिसांनी विविध गुन्ह्या खाली झालेल्या हिंसाचार प्रकरणात एकूण पाच गुन्हे नोंदवत तब्बल 450 ते 500 आंदोलकांनावर गुन्हा दाखल तर त्यापैकी 24 जणांना अटक करण्यात आली होती.
या संदर्भात आज तीन आठवड्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात जिल्हा न्यायाधीश (४) ए. पी. गोंधळेकर याच्या समोर सुनावणी पार पडली. संशयितांच्या वतीने ॲड. सागर शिंदे, ॲड. अभिजीत देसाई. ॲड. धनंजय चव्हाण, ॲड. केदार मुनीश्वर यांनी काम पाहिले. सरकार पक्षामार्फत ॲड. समीर तांबेकर आणि ॲड. पी. जी. जाधव यांनी काम पाहिले असून या सुनावणीत 17 जणांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर तोडफोडीत फोटोंमध्ये दिसणाऱ्या सात जणांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
जामीन मंजूर न झालेले सात जण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली असून चेतन आनंदराव जाधव (वय ३०), ओंकार दादा साबळे (२१), सूरज माणिक पाटील (२९), आदित्य अविनाश उलपे (२९), ओंकार तुकाराम चौगुले (२१, सर्व रा. कसबा बावडा, कोल्हापूर), ओंकार सुनीलसिंह राजपूत (२९, रा. जाधववाडी, कोल्हापूर) आणि सिद्धार्थ धोंडिबा कटकधोंड (३०, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) अशी जामीन नामंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत.