रविवारी रात्री आरोपी जय चावडा याला मृतदेहासह ताब्यात घेतल्यानंतर नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. मात्र तो मूकबधिर असल्याने नेमकं काय सांगत आहे, हे समजण्यात अडथळे येत होते. मात्र त्याच वेळी या भागात गस्त घालणाऱ्या एका कॉन्स्टेबलच्या हा प्रकार लक्षात आला. माझाही मुलगाही मूकबधिर आहे, असे सांगून तो मुलाला घेऊन आला. अखेर कॉन्स्टेबलच्या मुलाच्या माध्यमातून पोलिसांनी जय चावडा याच्याकडून थोडीफार माहिती मिळवली. त्यावरुन घटनाक्रमाचा उलगडा झाला.
दरम्यान, आरोपींनी हत्या करतानाच्या घटनेचे मोबाईलमध्ये शूटिंग केल्याचे समोर आले आहे. तसेच हत्या करताना त्यांनी काही जणांना व्हिडीओ कॉलही केला होता. प्रेम प्रकरणातून अर्शद शेख याची हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक कयास आहे. दोघेही आरोपी जय चावडा आणि शिवजीत सिंग हे मूकबधिर असल्याने चौकशीत अडचणी येत आहेत.
त्या दिवशी घडलं तरी काय?
एक तरुण दादर रेल्वे स्थानकावर कोकणाच्या दिशेने जाणारी तुतारी एक्स्प्रेस पकडण्याचा करत होता. त्याच्याकडे असलेली ट्रॉली बॅग जड असल्याने त्याला ती पेलवत नव्हती. बॅगेखाली पडलेले रक्ताचे थेंब आरपीएफ जवानाच्या निदर्शनास आले. त्याने बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला.
दादर रेल्वे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. जयला दादर स्थानकावरच ताब्यात घेण्यात आले. तर त्याने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर येथून शिवजीत सिंगला अटक करण्यात आली. पायधुनी पोलिस दोघांची कसून चौकशी करत असून माहिती समजण्यासाठी एका शिक्षकाची मदत घेत आहेत.
जयचा कबुलीजबाब
जय हा एका खासगी कंपनीत अॅनिमेटर म्हणून काम करतो. रविवारी तो पायधुनीतील घरात शिवजीत आणि अर्शद यांच्यासोबत दारु पिण्यासाठी बसला होता. जय दारु घेऊन आला त्यावेळी शिवजीत आणि अर्शद यांच्यात जोरदार वादावादी सुरु होती. यावेळी शिवजीतने रागाच्या भारत घरातील हातोडा अर्शदच्या डोक्यात घातला. त्यानंतर घरातील काच फोडून त्याने अर्शदच्या शरीरावर वार केले.
ही घटना जयने मोबाइलमध्ये शूट केली. शिवजीतने धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याचा दावा जयने केला आहे. मृतदेह बॅगेत भरुन आपण पायधुनीहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला गेलो. तिथून खोपोली लोकल पकडून दादरला उतरलो. तिथे तुतारी एक्स्प्रेस पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ११ वर गेल्याचे जयने सांगितल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.