मुंबईत २ हजार ५० किमीचे रस्ते असून यापैकी ५० टक्के म्हणजेच साधारण १,२०० किमीहून अधिक रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची कामे दोन टप्प्यात केली जाणार आहेत. यामध्ये मुंबईत पहिल्या टप्प्यांतर्गत एकूण ३९७ किमी रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये शहर भागातील कामे सोडता पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील कामे असून ३० किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे पावसाळ्यानंतर अधिक वेगाने होणे अपेक्षित आहे.
तर दुसऱ्या टप्प्यांतर्गत मुंबईतील ४०० किमी रस्त्यांची नियोजित सिमेंट काँक्रीट कामाची निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर होती. या काँक्रिट कामातील शहर भागातील कामे सोडता पश्चिम आणि पूर्व उपनगरातील निविदाकामांना मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर निविदाधारकांना कंत्राट दिले जाणार असून लवकरच कार्यादेश काढले जाणार आहे. त्याची अंतिम प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दुसऱ्या टप्प्यातील शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणासाठी अंदाज दरापेक्षा नऊ टक्क्याहून अधिक दर निश्चित केले आहेत. त्यामुळे यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी, हे कामही रखडण्याची शक्यता आहे. या टप्प्यातील शहर सोडता उपनगरातील कामे पावसाळ्यानंतर सुरू होतील.
काम सुरू न झाल्याने कंत्राटच रद्द
पहिल्या टप्प्यात मुंबईतील शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३९७ किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामासाठी जानेवारी २०२३ मध्येच निविदा काढण्यात आली होती. यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचे कंत्राट पाच कंपन्यांना दिले. मात्र मुंबई शहरातील रस्ते काँक्रीट कामांना सुरुवातच न झाल्याने मुंबई महापालिकेने कंत्राटदाराचे कंत्राट रद्द केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयीन प्रकरण मार्गी लागल्यानंतर शहरातील कामांसाठी महापालिकेकडून नव्याने निविदा काढली. मात्र त्यावरही निर्णय झालेला नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील शहर भागातील कामे ही अद्याप बंदच असून ती पावसाळ्यानंतरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या टप्प्यातही शहरातील काँक्रीटीकरणाच्या निविदांवर निर्णय झालेला नसून त्याचीही प्रतीक्षा आहे
दुसऱ्या टप्प्यात झोन तीन ते झोन सात
दुसऱ्या टप्प्यात महापालिकेच्या झोन तीनमध्ये वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व आणि पश्चिम, विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामांसाठी १ हजार ४६४ कोटी ९२ लाख रुपये खर्च होणार आहे. झोन चारमध्ये विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम, गोरेगाव, मालाड असून २ हजार ६५५ कोटी, झोन पाच आणि सहा संपूर्ण पूर्व उपनगरांतील कामांसाठी १ हजार ६७५ कोटी ९४ लाख, झोन सातमधील कांदिवली, बोरिवली, दहिसरमधील कामांसाठी २ हजार ३७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.