मावळ येथे पत्रकारांशी बोलताना सुनील शेळके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मावळचे विद्यमान आमदार जरी सुनील शेळके असतील तरीही या जागेवर भाजपने दावा सांगितलेला असून सुनील शेळकेंना विधानसभेला मदत न करण्याची भूमिका माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी घेतली आहे.
ठरावामागे राजकारण, वरिष्ठांनी मला सांगितलंय
सुनील शेळके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र काम केले, हे भाजपला मान्य होते. मात्र मला वरिष्ठ नेत्यांकडून काही सूचना आल्या आहेत. याबाबत “वेट अँड वॉच” असे सांगण्यात आले आहे. तुम्ही शांत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जो ठराव केलेला आहे, त्यामागे काही वेगळे राजकारण आहे, असे वरिष्ठांकडून मला कळविण्यात आले आहे.
भाजप तुमच्यामागे, तुम्ही कसलाच विचार करू नका, वरिष्ठांचा मला मेसेज
स्थानिक नेत्यांनी केलेल्या ठरावासंबंधी कुठलाही विचार करू नका. मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तुमच्या पाठीमागे उभा राहील, असा विश्वास माझ्या वरिष्ठांनी मला दिलेला आहे. त्यामुळे उद्या ही जागा महायुतीला सोडताना राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार आहे हे अजून ठरलेले नाही. मात्र याच्या अगोदरच असा निर्णय कशासाठी केला हे मला माहिती नसल्याचे सुनील शेळके यांनी सांगितले.