स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी खासगी शिकवणी लावण्याची निकिताची परिस्थिती नव्हती. ती गेल्या अडीच वर्षांपासून सोशल मीडियापासून लांब राहत धुळे शहरातील जिल्हा ग्रंथालयात रोज बारा तास अभ्यास करत होती. तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. निकिता परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे कळताच पाटील कुटुंबाचा ग्रामस्थांनी सन्मान केला. या वेळी निकिताच्या आई-वडिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. निकिता गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती.
निकिताला आई-वडिलांचे प्रोत्साहन
निकिता पाटील यांच्या आई शिक्षित असून वडील अशिक्षित आहे. त्यांनी मुलीला शिक्षणासाठी नेहमी मदत केली. निकिता पाटील यांनीही आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून जिद्द, चिकाटी व कठोर मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले. आई-वडिलांचे स्वप्न देखील मी पूर्ण केले आहे..
निकिताने युवक युवतींना केले आव्हान
आमच्या गावातील अनेक तरुण तरुणी अधिकारी झाले आहेत, त्यामुळे माझं स्वप्न देखील होते की मी पण अधिकारी होणार, त्यामुळे मी सोशल मीडियापासून खूप लांब होते, बारा तास अभ्यास करण्यामध्ये व्यस्त होते, मी कुठल्याही प्रकारचे शिकवणे देखील लावलेले नाही, कारण माझी परिस्थिती नव्हती, माझे आई-वडील शेती काम करत असल्यामुळे मी जास्त पैसे खर्च न करता स्पर्धा परीक्षेची तयारी केली, आणि आज , पोलीस उपनिरीक्षक पदासाठी कुठेतरी यश मिळवून स्वप्न पूर्ण झाल्या आहेत, माझं एकच म्हणणं आहे की ग्रामीण भागातील मुलींनी स्पर्धा परीक्षा द्यावी. सोशल मीडियापासून लांब राहावे असे आवाहन निकिता पाटील यांनी केले आहे..