नांदेड : नांदेडच्या खादी ग्राम उद्योग समितीकडून तयार केल्या जाणाऱ्या राष्ट्रध्वजाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील १६ राज्यातील शासकीय कर्यालयावर नांदेडचा राष्ट्रीय ध्वज फडकत असतो. ही बाब नांदेडसाठी अभिमानस्पदाची बनली आहे. १५ ऑगस्ट अवघ्या आठ दिवसावर येऊन ठेपल्याने खादी ग्राम उद्योगमध्ये राष्ट्रीय ध्वज तयार करण्याच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ५० लाख ध्वजांची निर्मिती करण्यात आली आहे. जवळपास २५ लाख रूपयांच्या ध्वजांची विक्री झाल्याची माहिती मराठवाडा खादी ग्राम उद्योग समितीकडून देण्यात आली आहे.देशात दोन ठिकाणीच राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. यात नांदेड आणि कर्नाटकातील हुबळी केंद्राचा समावेश होतो. नांदेडमध्ये १९९३ पासून ध्वजनिर्मिती होते. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन टप्यात नांदेडमध्ये राष्ट्रीय ध्वज तयार केला जातो. वर्षभरात ध्वजाची निर्मिती होत असते. विशेष म्हणजे नांदेडमध्ये तयार होणारा राष्ट्रीय ध्वज महाराष्ट्रासह दिल्ली, अरुणाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलगंणा, छत्तीसढ, गुजरात, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, तामिळनाडू, मध्यप्रदेश यासह इतर राज्यातील शासकीय कार्यालयात राष्ट्रीय ध्वज फडकतो. सर्वात मोठा ध्वज १४ बाय २१ फूट आकाराचा असतो. तर अन्य ध्वज ८ बाय २१ फूट, ६ बाय ९ फूट, ३ बाय साडेचार फूट, २ बाय ३ फूट आणि साडेसहा इंच बाय ९ इंच पर्यंतच्या एवढ्या आकाराचा ध्वज निर्मित केला जातो. दरवर्षी या ध्वज विक्रीतून समितीला कोठ्यावधीचं उत्पन्न मिळत असते.
Sheikh Hasina: हसीना पायउतार होताच बांगलादेशचा पाकिस्तानबद्दल मोठा निर्णय; देशाची सूत्रं कोणाच्या हाती?
अशी होते होते राष्ट्रीय ध्वजाची निर्मिती
ध्वजनिर्मितीसाठी लातूर जिल्हयातील उदगीर येथील संस्थेच्या केंद्रात तयार होणाऱ्या कोऱ्या खादी कापडाचा उपयोग केला जातो. सुरुवातीला कोरा खादी कपडा अहमदाबाद (गुजरात) येथे शासन मान्यताप्राप्त बीएमसी मिलमध्ये पाठवण्यात येतो. याठिकाणी तीन रंगात स्वतंत्र ताग्याच्या स्वरूपात कपडा तयार होतो. त्यानंतर शासन निर्धारित प्रमाणकानुसार कापडाची क्षमता यंत्रावर तपासली जाते. त्यानंतरच ध्वजनिर्मितीसाठी त्या कापडाचा उपयोग होतो. दरम्यान, स्क्रीन पेंटिंगच्या साहाय्याने ध्वाजावर अशोक चक्र उमटवण्यात येते. ध्वजासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीला घट्ट धरुन ठेवण्यासाठी गरडीचा उपयोग केला जातो. ही गरडी हलदी, साल, साग, शिसम या लकडापासून तयार केलेली असते. दोरी मुंबईवरुन मागविण्यात येते. पावसात भिजली तरी, ती खराब होत नसल्याचे सांगण्यात आले. या सर्वप्रक्रियेला दोन महिने लागतात, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.