इरफान शेख, सोलापूर : ज्याप्रमाणे माढा लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात प्रसिद्धीझोतात आला होता, त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदारसंघ चर्चेत येऊ लागला आहे. ४ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांची सभा माढा तालुक्यातील अरण गावात झाली. याच सभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उभय नेत्यांवर सडकून टीका केली आहे. फडणवील आणि भुजबळ हे दोघे ज्या तालुक्यात सभेला जातील, त्या तालुक्याच्या आमदाराला, त्यांच्या उमेदवारांना पाडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. सोलापुरात येऊन जरांगे पाटलांनी समाजाला आवाहन केल्याने याचा अप्रत्यक्ष फायदा माढा तालुक्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांना अप्रत्यक्ष फायदा होणार आहे.विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये संजय कोकाटे यांचा निसटता पराभव झाला होता. २०२४ च्या निवडणुकीत सर्व उणिवांवर मात करत संजय कोकाटे यांनी बबनदादा शिंदे यांच्या विरोधात मतदारसंघात दंड थोपटले आहे. मनोज जरांगे पाटील हे अतिशय हुशार आहेत. विधानसभा निवडणुकीचा योग्य निर्णय घेतील, असे संजय कोकाटे म्हणाले.
जरांगे अतिशय हुशार, विधानसभा निवडणुकीचा त्यांना अंदाज, योग्य निर्णय घेतील
मनोज जरांगे पाटील हे अतिशय हुशार आहेत. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत ते योग्य निर्णय घेतील. भाजपा सोबत असलेल्या विद्यमान आमदारांना पाडा असेच ते समाजाला आवाहन करतील, असा अंदाज कोकाटे यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आवाहनाला समाजाचा प्रचंड प्रतिसाद पाहता सोलापुरातील मराठा आमदारांच्या मनात विधानसभेविषयी धडकी भरली आहे.
शरद पवार राजकारणातील पांडुरंग, सर्वच नेते दर्शनाला येतात
माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबन दादा शिंदे मुलासह शरद पवारांच्या भेटीला गेले होते. हाच धागा पकडून संजय कोकाटे यांनी बबन शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली. ईडीच्या भीतीपोटी बबनदादा शिंदे अजित पवारांसोबत गेले होते. आता विधानसभेचा पराभव समोर दिसत असल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. शरद पवार हे राजकारणमधील पांडुरंग आहेत, असे अनेक राजकीय नेते व आमदार दर्शनाला जात असतात, असे ते म्हणाले.